वासुदेव पागी,पणजी: वागातोर येथे सुरू असलेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिवलच्या आयोजकाने हाणजुण कोमुनिदादला देणे असलेले २.४४ कोटी रुपये शुल्क न फेडताच फेस्टिवल सुरू केले होते. त्यामुळे एका गावकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाची नोटीस मिळताच न्यायालयाच्या कारवाईच्या बडग्यातून वाचवण्यासाठी सनबर्न आयोजकांनी रक्कम जमा केली.
सनबर्न आयोजकांनी हणजूण कोमुनिदादकडे जमीन वापरण्यासाठी २.४३ कोटी रुपये भाडे भरले नसल्यामुळे महोत्सव बंद करावा, अशी मागणी करणारी याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने या प्रकरणात शुक्रवारीच नावाने ठेवली होती. हे प्रकरण सुनावणीला येताच सनबर्न महोत्सव आयोजकांकडून विविध शुल्क मिळून ३.२८ कोटी जमा झाल्याची माहिती खंडपीठात देण्यात आली. म्हणजेच या प्रकरणात शुल्कासाठी गावकरी न्यायालयात धावल्यामुळे आणि न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवल्यामुळे न्यायालय सनबर्न फेस्टिवल थांबविण्याचा आदेश देईल या भीतीने आयोजकांकडून ही रक्कम जमा करण्यात आली. नाक दाबून तोंड उघडण्या सारखा हा प्रकार झाला. दरम्यान आयोजकाकडून जमा करण्यात आलेल्या ३.२८ कोटी रुपये रकमे पैकी २.४३ कोटी रुपये हे हाणजून कोमुनिदादच्या वाट्याचे आहेत.