फोंडा - राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पावरून वरून रविवारची भोम ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी होणार असल्यास संबंधित जे आराखडे बांधण्यात येत होते ते शेवटी सत्यात उतरले व ग्रामसभा चांगलीच वादळी झाली. काही वेळा प्रकरण हातघाईवर सुद्धा गेले. सरपंच दामोदर नाईक यांनी समय सूचकता दाखवताना वेळीच दोन्ही गटांमध्ये हस्तक्षेप केल्याने प्रकरण चिघळले नाही.
रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होताच वेगवेगळ्या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाल धारेवर धरायला सुरुवात केली होती. प्रश्न वाढत चालले आहेत परंतु जो मूळ मुद्दा आहे तो चर्चेला येत नाही ते पाहून शेवटी इतर प्रश्न बाजूला ठेवण्यात आले व महामार्गाचा प्रश्न चर्चेला घेण्यात आला. त्यावेळी आंदोलन कर्ते संजय नाईक यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात सरकारने ग्रामस्थांना कसे अंधारात ठेवले हे पटवून देण्याचा प्रयत्न ते करत होते.
त्याचवेळी सरपंच दामोदर नाईक हे मात्र त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण पंचायत मंडळाला अंधारात ठेवून सर्वकाही गोष्टी घडत आहे याचे सुतोवाच ते करत होते. दोघांमध्ये वादविवाद चालू असतानाच ग्रामस्थांच्य दोन गटांमध्ये बाचांबाची सुरू झाली व प्रकरण हातघाई वर गेले. राष्ट्रीय महामार्ग गावातून नको असा हट्ट धरलेल्या महिला शेवटी उग्र बनल्या व त्या जे काही पंच सदस्य प्रकल्पाला पाठिंबा देत आहे त्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्याच वेळी काही लोक संजय नाईक यांच्या अंगावर धावून गेल्याने प्रकरण चिघळले गेले. शेवटी पोलिसांना अधिक कुमक मागवावी लागली. सरपंच दामोदर नाईक यांनी प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच सभास्थान सोडून ग्रामस्थांमध्ये धाव घेतली व दोन्ही गटांची समजूत काढली. शेवटी लोकांचा एकूण रोष पाहून महामार्ग संबंधी सर्व पंचायत मंडळ ग्रामस्थ बरोबर राहील असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, स्थानिक आमदार इत्यादी व ग्रामस्थ इत्यादींची एक व्यापक बैठक लवकरच घेण्याचे ठरले .ह्या ठरावावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सभा आटोपती घेण्यात आली.