पणजी : कूळ कायद्यातील वादग्रस्त ‘सनसेट’ कलम आणि कंत्राट शेती पद्धतीची तरतूद रद्द करण्यास विधानसभेची परवानगी घेण्यासाठी कूळ कायदा दुरुस्ती विधेयक उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी बुधवारी विधानसभेत सादर केले. १९६४ सालच्या गोवा, दमण व दिव कृषी कूळ कायद्यात दीड-दोन वर्षांपूर्वी सरकारने दुरुस्त्या केल्या होत्या. त्या दुरुस्त्यांद्वारे कुळांचे सर्व खटले काढून न्यायालयाकडे सोपविण्यात आले. ती दुरुस्ती सरकार मागे घेत नाही. तथापि, तीन वर्षांतच कुळांनी अर्ज करायला हवे, अशा प्रकारचे जे सनसेट कलम होते, ते मागे घेतले जात आहे. तसेच कंत्राट शेतीची तरतूदही रद्द केली जात आहे. यामुळेच आता विधेयक सादर झाले आहे. विधेयकातील कलम ४ अ आणि ६० सी रद्द केले जात आहे. त्याऐवजी ६० ई कलम समाविष्ट केले जात असल्याचे दुरुस्ती विधेयकात म्हटले आहे. गोवा मुंडकार (संरक्षण) कायद्यातही सनसेट कलम होते. तेही रद्द केले जात आहे. (खास प्रतिनिधी)
सनसेट कलम,कंत्राट शेती रद्द
By admin | Published: August 13, 2015 2:04 AM