पणजी: नवीन सुपर स्पेशालिटी इमारत ही गोव्यातील आरोग्यसेवा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, ती साकारल्यानंतर गोमेकॉतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे अत्युच्च प्रकारच्या सुपर स्पेशालिटी देणारे देशातील अव्वल क्रमांकाचे सरकारी इस्पितळ ठरणार आहे. या प्रकल्पानंतर गोमेकॉतील आरोग्य सुविधांची क्षमता तीन पटीने वाढणार आहे.या इस्पितळातील प्रत्येक विभागात अतिरिक्त ३० खाटांची व्यवस्था होणार आहे. एकूण ५०० खाटांची सोय त्यात होणार आहे. या खाटाही अत्याधुनिक असतील. प्रत्येक विभागात रुग्णाला सोयीस्कर अशा पद्धतीने बनविण्यात आलेल्या खाटा असतील. तसेच व्हेटिंलेटर, डायलेसिसच्या क्षमता या तीनपटीने वाढणार आहेत. एका वेळी आता १० रुग्णांवर डायलेसिस करण्याची जीएमसीची सध्याची क्षमता असेल तर नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी ३० जणांवर डायलेसिस करणे शक्य होणार आहे. शिवाय एक दोन मशिन्समध्ये बिघाड झाला तरी रुग्णांच्या डायलेसिसच्या वेळेतही कात्री लावण्याची गरज भासणार नाही. अडगळीच्या ठिकाणी असलेली हृदय विभागाची सुपर स्पेशालिटी प्रशस्त विभागात आणल्यानंतर सुविधांची क्षमताही वाढविली जाणार आहे. एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, इको कार्डिओग्राम, स्ट्रेसटेस्ट या सेवांची क्षमता वाढविली जाणार आहे. मात्र त्यासाठी अधिक मशिनरीची आणि तज्ज्ञांची संख्याही वाढवावी लागणार आहे.न्युरोसर्जरी एकीकडे आणि न्युरोलोजी विभाग दुसरीकडे असे सध्याच्या स्थितीत जी परिस्थिती होत आहे ती नवीन इमारत झाल्यावर राहणार नाही. एकाच मजल्यावर न्युरोलोजी व न्युरो सर्जरी विभाग असणार आहेत. याच तत्वाला धरून अस्तिरोग विभाग, युरोलोजी नेफ्लोलोजी, हृदय विभाग यासह सर्व दहाही सुपर स्पेशालिटी विभागांची रचना करण्यात येणार असल्याची माहिती गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. सर्व सुपर स्पेशालिटी विभाग एकाच इमारतीत आणल्यानंतर आणि त्यात रुग्णांची क्षमता वाढविल्यानंतर साधन सुविधांतही वाढ करणे हे अपेक्षितच आहे. साधने, उपकरणे, अद्यवत मशिनरी आणि गोमेकॉच्या यात्री निवास विभागाच्या मागे असलेली ही जमीन गोमेकॉच्या मालकीची असल्यामुळे या जागेत सुपर स्पेशालिटी विभागासाठी ८ मजली इमारत बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला होता.या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून १५० कोटी रुपयेही मंजूर झाले आहेत. एकूण प्रकल्पाच्या ६० टक्के रक्कम ही केंद्राकडून तर ४० टक्के ही राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. तेथून रस्ता गेलेला असल्यामुळे कुंपणाच्या बाहेर असलेल्या या जागेत अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळेच प्रकल्पाचे बांधकाम रखडले होते. हे अतिक्रमण पाडण्यात आल्यामुळे सुपर स्पेशालिटीचा मार्ग मोकळा झाला आहे. १३ फेब्रुवारी रोजी त्यासाठी पायाभरणी होणार आहे.
गोमेकॉची क्षमता तिप्पट वाढविणार सुपर स्पेशालिटी ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 9:18 PM