पणजी : गोव्यातील फोंडा तालुक्यात लवकरच घरगुती वापराच्या गॅसचा पाईपलाईनमधून पुरवठा सुरु होणार असून अशा पध्दतीची सोय होणारा राज्यातील हा पहिला तालुका ठरणार आहे. गोकाकहून आलेल्या वायूवाहिनीव्दारे सध्या सांकवाळ येथील झुवारी खत कारखान्याला गॅस पुरवठा केला जात आहे. अन्य एक-दोन कारखान्यांनाही हा वायू पुरवठा केला जात आहे.
गोकाकहून येणारी ही भूमिगत वायुवाहिनी मुरगांव, फोंडा व डिचोली या तीन तालुक्यांमधून जाते. राज्यात सुमारे ११0 किलोमिटर लांबीची ही वायुवाहिनी तीन तालुक्यांमधील १६ गावांमधून जाते. कुडचिरे व मडकई येथे मॉनिटरिंग स्टेशन्स तर मांडवी झुवारी नदी पार करण्यासाठी बोगदे आहेत. दाभोळ-बंगळूर वाहिनीला गोकाक येथे फाटा देऊन ती गोव्याकडे वळविण्यात आली आहे. गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया (गेल)चा हा प्रकल्प आहे. कर्नाटकातून येणारी ही वाहिनी डिचोली तालुक्यातील विर्डी येथून गोव्यात प्रवेश करते. मावळिंगे, कुडचिरें, कारापूरमार्गे आमोणे येथे आल्यानंतर मांडवी पात्रातून ती पुढे फोंडा तालुक्यात खांडोळा, तिवरें, वरगांव, अडकोण, भोम व कुंडई हे गाव घेत मडकई येथे झुवारी नदी पार करीत मुरगांव तालुक्यातील कुठ्ठाळी, केळशीमार्गे सांकवाळपर्यंत जाते. दिवाळीनंतर फोंड्यात वायूवाहिनी जोडण्यांसाठी नोंदणी सुरु होणार आहे.
गोवा नॅचरल गॅस लि,चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. के. सचदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार नोंदणीनंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरु होईपर्यंत दोन महिने लागतील त्यामुळे येत्या मार्चपासून फोंडावासीयांना या वाहिनीव्दारे येणारा गॅस मिळू शकतो. या वाहिनीतून येणाऱ्या वायूचे सीएनजीमध्ये रुपांतर करुन तो बसगाड्यांसाठी इंधन म्हणून उपयोगात आणण्याचीही योजना आहे. राज्यात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या कदंब महामंडळाच्या बसगाड्यांनाही हा गॅस कालांतराने वापरला जाणार आहे.