लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदारांनी मंगळवारी एकत्र येत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जातीयवादी असल्याची टीका केली. या पत्रकार परिषदेत एनडीएतील सर्व घटक, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, आमदार जीत आरोलकर, अपक्ष आमदार रेजिनाल्द लॉरेन्स, आमदार चंद्रकांत शेट्ये, आमदार आंतोन वास, भाजपचे दक्षिण गोवा लोकसभा समन्वयक तथा माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'आज भाजपच धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. गोव्यातील बांधवांसाठी ओसीआय प्रश्न आम्ही सोडवला. माझ्या सरकारने त्यासाठी केंद्रात सातत्याने पाठपुरावा केला. विदेशात असलेल्या गोमंतकीयांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची आमची जबाबदारी आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून त्यांच्या अपयशाचे दर्शन घडते.'
'महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक अॅड. रमाकांत खलप यांनी संसदेत आणले होते तर मग त्यांनी या विधेयकाचा पाठपुरावा का केला नाही? हे विधेयक त्यावेळी संमत का करून घेतले नाही?' असा प्रश्नही सावंत यांनी केला. मुख्यमंत्री म्हणाले की, सीआरझेडबाबत मच्छीमारांची घरे वाचवली जातील. गोव्यात ज्या-ज्या लोकांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनीत घरे बांधलेली आहेत, त्यांची घरे सरकार पाडणार नाही याची हमी मी देतो.'
ज्येष्ठांना मोफत वैद्यकीय उपचार
या निवडणुकीसाठी राष्ट्राचा विचार करा', असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपच्या केंद्रीय जाहीरनाम्यात सत्तर वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार जाहीर केले आहेत. ही एक मोठी घोषणा आहे. उलट काँग्रेसचा जाहीरनामा संभ्रम निर्माण करणारा आहे. कोणाची संपत्ती काढून कोणाला वाटणार, हे काही स्पष्ट नाही. म्हादईच्या बाबतीत काँग्रेस राजकारण करत आहेत आमच्यासाठी ती जीवनदायी आहे.' वन नेशन वन इलेक्शन, महिलांचे राजकीय आरक्षण, नागरिकत्व कायदा आदी विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच सत्तेवर येणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शासकीय कामात मराठीचा वापर
मुख्यमंत्री म्हणाले की, 'काँग्रेस सत्तेवर असताना राजभाषा कायदा केला. त्यामुळे विजय सरदेसाई यांनी लोकांची दिशाभूल करू नये. कोकणी राजभाषा आहे. मराठीचा वापरही आम्ही करतो. मराठी शासकीय कामात सातत्याने वापरली जाते. मराठीला राजभाषेचा दर्जा दिलेला नाही. सरदेसाई यांनी या प्रश्नावर राजकारण करू नये.'
अमित शहा यांची म्हापशात शुक्रवारी सभा
'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा म्हापसा येथे येत्या शुक्रवारी (दि. ३ मे) सायंकाळी ५ वाजता आंतरराज्य बसस्थानकावर होणार आहे. तसेच त्याच्या आदल्या दिवशी, गुरुवारी (दि. २) फोंड्यातही जाहीर सभा होईल. या सभेला स्थानिक नेते रवी नाईक, सुदिन ढवळीकर सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे हे चारही मंत्री व स्थानिक नेते उपस्थित असतील' अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
अबकी बार ४०० पार नक्की आहे. मोदींनी महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण दिले. गोव्यात एसटी बांधवांना राजकीय आरक्षणाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.