- सचिन कोरडे
पणजी : मॉडेल्स क्षेत्रातील सर्वाेच्च अशी स्पर्धा म्हणजेच सुप्रानॅशनल. ही स्पर्धा जिंकून इतिहास रचणारा गोमंतक भूमीतील प्रथमेशमावळींगकर शुक्रवारी मायभूमीत दाखल झाला. प्रथमेशचे आता जगभर चाहते आहेत. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वॉटरमॅन, अक्वॉमॅन म्हणून संबोधला जाणारा सुप्रानॅशनल प्रथमेश गोव्यातील अस्वच्छ किना-यांबाबत मात्र अस्वस्थ आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे दु:ख व्यक्त केले. प्रथमेश म्हणाला की, आज गोव्याची जी जगभर ओळख आहे ती येथील निसर्गसौंदर्यामुळे. गोव्यातील समुद्रकिनारे विदेशींना भुरळ घालतात. त्याच जोरावर पर्यटन व्यवसायही चालतो. हे समुद्रकिनारेच नसतील तर.... आज किनाºयांवर प्लास्टिक पसरले आहे. प्रदूषण वाढले आहे. अस्वच्छता पसरली आहे. हे असेच सुरू राहिले तर गोव्याच्या अस्तित्वाला धोका आहे. त्यामुळे हे थांबायला हवे. आज जागतिक स्तरावर गोव्याचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो आणि येथे आल्यानंतर तेवढेच दु:खही होते. कारण येथील समुद्राशी माझे अत्यंत जवळचे नाते आहे. त्यामुळे मी ‘बीच क्लिनिंग’साठी योगदान देणार आहे. त्यासाठी स्व:ता एनजीओ स्थापन करणार. मुंबईत अशा संस्थेशी मी जुळलेलो आहे. गोव्यातही माझ्याकडून असे कार्य व्हावे, यासाठी मी उत्सुक आहे.पोलंड येथे झालेली सुप्रानॅशनल स्पर्धा जिंकणारा प्रथमेश हा आशियातील एकमेव स्पर्धक ठरला. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली स्पर्धा जिंकून प्रथमेशने फॅशन आणि मॉडेल क्षेत्राला आपल्याकडे आकर्षित केले. आता या क्षेत्रातील तमाम लोक प्रथमेशच्या संपर्कात आहेत. मुंबईत जंगी स्वागतानंतर प्रथमेश प्रथमच गोव्यातील पत्रकारांपुढे आला. मुलाखतीत त्याने आपला प्रवास उलगडला. एक राष्ट्रीय फुटबॉलपटू, नंतर मिस्टर इंडिया आणि आता मिस्टर सुप्रानॅशनल... याबाबत काय सांगशील, असे विचारल्यावर तो भावूक झाला. तो म्हणाला, खेळाडू म्हणून जेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करीत होतो आणि भारताची जर्सी अंगावर असताना राष्ट्रगीत वाजायचे तेव्हा छाती अभिमानाने फुलत होती. मी वरिष्ठ संघाकडून खेळू शकलो नाही; पण ती भावना मात्र अनुभवली आहे. दुखापतीमुळे फुटबॉल सोडावे लागले. पुढे काय करणार याबाबत काहीही निश्चित नव्हते. घरात बसून राहायचो. काय करावं हा प्रश्न सतावत होता. तेव्हा घरातच जीम सुरू केली आणि शरीरयष्टी बनवली. या शरीरयष्टीचा उपयोग व्हावा म्हणून ‘मिस्टर इंडिया’च्या मैदानात उतरलो. तेथे निवडला गेलो आणि येथून जीवनाला कलाटणी मिळाली. फुटबॉल सोडून ग्लॅमरच्या क्षेत्रात आलो. आज सुप्रानॅशनल जिंकलो. जेव्हा माझे नाव जाहीर झाले तेव्हा माझे हात थरथर कापत होते. भावनाशून्य झालो होतो; कारण येथे देशाचे प्रतिनिधित्व होते. मी माझ्या परीने १०० टक्के योगदान दिले. ३९ देशांच्या स्पर्धकांतून निवड झाल्यानंतर सर्व काही स्वप्नवत वाटत होते.
बॉलिवूडमध्येही ‘एंट्री’ करणार सुप्रानॅशनल स्पर्धा जिंकल्यानंतर देशातीलच नव्हे तर विदेशातील चाहत्यांचीही संख्या जबरदस्त वाढली आहे. शुभेच्छां संदेशांच्या ओझ्याने फोनही बंद पडतोय. स्पर्धा जिंकल्यानंतर जीवन बदलल्यासारखे वाटतेय. स्टार झाल्याची कल्पना आनंद देऊन जातेय. मी रणवीर सिंगचा मोठा चाहता आहे. त्यानेही मला शुभेच्छा दिल्या होत्या. बॉलीवूडमधील बºयाच कलाकारांचे फोनही येतात. भविष्यात संधी मिळाली तर बॉलीवूडमध्ये निश्चितच ‘एंट्री’ करेन. परंतु, सध्या सुप्रानॅशनल आॅर्गनायझेशनसोबतएक वर्षाचा करार असल्याने माझ्याकडे वेळ नाही. या कालावधीत मला विश्वभ्रमण करायचे आहे.
सुप्रानॅशनलबाबत...८ डिसेंबर २०१८ रोजी किनिका-झेडरोज (पोलंड) येथे मिस्टर सुप्रानॅशनलचे तिसरे सत्र पार पडले. यामध्ये अंतिम फेरीत जगातील ३९ स्पर्धकांमध्ये चुरस होती. त्यात गोव्याच्या प्रथमेशने किताब पटकाविला. याच स्पर्धेत ‘बेस्ट बॉडी आॅफ द इयर’चाही पुरस्कार त्याने नावे केला. शरीर तयार करण्यासाठी मी तीन वर्षांपासून कठोर मेहनत घेत होतो.आहार-विहार आणि व्यायाम मी अत्यंत काटेकोरपणे पाळला. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा वाटतो, असेही प्रथमेशने सांगितले. मॉडेलिंग अणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नवीन गुणवान लोकांचा शोध घेऊन त्यांना ‘ताबडतोब सेलिब्रिटी’ बनवणं हे या स्पर्धेचे ध्येय आहे.