मडगाव: कुडचडे येथील बसूराज बारकी खून प्रकरणातील संशयित सुरेशकुमार सोळंकी याला माफीचा साक्षीदाराची सवलत देऊ नये हा इतर संशयितांनी घेतलेला आक्षेप दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायोनोरा लाड यांनी फेटाळून लावताना सदर संशयिताला माफीचा साक्षीदार म्हणून सोमवारी जाहीर केले.मागच्या एप्रिल महिन्यात झालेल्या या खून प्रकरणात अभियोग पक्षाला मदत करण्याची आपली तयारी आहे, असा दावा करून सोळंकी याने आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावे असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या अर्जाला सरकारी अभियोक्ता व्ही. जे. कोस्ता यांनी ना हरकत दिली होती. मात्र एका संशयिताने या अर्जाला हरकत घेतली होती. मात्र सोमवारी ही हरकत फेटाळण्यात आली.कुडचडे येथे एका फ्लॅटात 2 एप्रिल रोजी बसूराज याचा खून त्याची पत्नी कल्पना बारकी हिने आपल्या मित्रांच्या सहाय्याने केला होता. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरून मोलेच्या जंगलात फेकून दिले होते. त्यानंतर कल्पना हा फ्लॅट सोडून दुस-या ठिकाणी रहायला गेली होती. या खुनाची सुरुवातीला कुणीच वाच्यता केली नव्हती. मात्र सदर खून स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेल्या कल्पनाच्या एका मैत्रिणीने एक महिन्यांनंतर त्याला वाच्यता फोडल्यानंतर कुडचडे पोलिसांनी कल्पनासह पाच जणांना अटक केली होती.यापैकी सुरेश सोळंकी याच्या वतीने अॅड. अमेय प्रभूदेसाई यांनी बाजू मांडताना स्वत:चा अशील अभियोग पक्षाला मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र आणखी एका संशयिताने या खुनात सुरेशकुमारचा सहभाग इतर संशयितांएवढाच होता. त्यामुळे त्याला ही सवलत देऊ नये, अशी मागणी केली होती. दमलरम्यान, या प्रकरणातील अन्य एक संशयित पंकज पवार याने जामिनासाठी केलेल्या अर्जावर 29 नोव्हेंबर रोजी न्या. लाड निकाल देणार आहेत. अॅड. राजीव गोमीस यांनी या जामीन अर्जावर युक्तीवाद केला होता.
सुरेशकुमार सोळंकी शेवटी माफीचा साक्षीदार, अन्य संशयिताचा आक्षेप न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 9:08 PM