लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात भाजपकडे टक्कर देण्याची ताकद फक्त आरजीकडेच आहे, दावा असा करत पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनल्याचे ते म्हणाले.
चार राज्यांच्या विधानसभा निकालानंतर तीन राज्यांमध्ये काँग्रेसची जी धूळधाण झाली आहे, ते पाहता काँग्रेसला कोणतेच भवितव्य राहिलेले नाही. राजस्थान व छत्तीसगढमध्ये काँग्रेस सत्ताही राखू शकले नाही, अशी टीका परब यांनी केली. ते म्हणाले की, निकालानंतर विरोधकांच्या 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनले आहे. दि. ६ रोजी 'इंडिया' अलायन्सची बैठक होणार होती. परंतु नीतिशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी पाठ फिरविल्याने ती रद्द झाली आहे. काँग्रेस आता 'इगो' बाजुला ठेवून इतर पक्षांना संधी द्यावी. जुना पक्ष असूनही लोकांनी कौल दिला नाही. काँग्रेसकडे आता केवळ तीन राज्ये राहिली आहेत.
परब म्हणाले की, गोव्यात विरोधकांच्या युतीबाबत इंडिया अलायन्सवर आम्ही अवलंबून न राहता आमचे काम चालूच ठेवले. येथे भाजपला आरजीच टक्कर देऊ शकतो.'