वास्को - दक्षिण गोव्यातील नवेवाडे, वास्को भागात राहणाऱ्या १६ वर्षीय गौतमी साळगावकर ह्या मुलीचा इस्पितळात उपचार घेताना मृत्यू झाला असून डेंग्यूमुळे ती मरण पोचल्याचा संशय आहे. गौतमी हिला संशयित डेंग्यू झाल्याचे समजल्यानंतर पाच दिवसापूर्वी तीला चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (दि.२६) पहाटे अचानक तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तिला त्वरित बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र येथे पोचण्यापूर्वीच ती मरण पोचली.
नवेवाडे, वास्को भागात राहणाऱ्या गौतमी साळगावकर ह्या मुलीचा डेंग्यूमुळे मंगळवारी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती शहरात पसरताच नागरिकांत पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत माहिती घेण्यासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांना संपर्क केला असता गौतमीला २१ नोव्हेंबर रोजी चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तिच्या रक्ताची तपासणी केली असता ‘एनएस१’ अहवाल ‘पोझीटीव्ह’ सापडल्याने तिला संशयित डेंग्यु झाल्याचे उघड झाल्याची माहीती डॉ. बोरकर यांनी दिली. यानंतर तिच्यावर उपचार चालू करण्यात आले असून तपासणी दरम्यान गौतमीची प्रकृती चांगली असल्याचे दिसून आले होते. सोमवारी (दि. २५) रात्री पर्यंत तिची प्रकृती चांगली असल्याचे तपासणी वेळी दिसून आले होते अशी माहीती डॉ. बोरकर यांनी पुढे दिली. मंगळवारी (दि.२६) पहाटे अचानक गौतमीच्या प्रकृतीत बिघाड होऊन रक्तदाब कमी झाल्याचे समजताच तिला त्वरित पुढच्या उपचारासाठी बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळात नेण्यात आले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच ती मरण पोचली अशी माहीती डॉ. बोरकर यांनी दिली. १६ वर्षीय गौतमी चा असा आकस्मीक मृत्यू झाल्याने तिच्या कुटूंबावर दुख्खाचा डोंगर कोसळण्याची परिस्थिती निर्माण झालेली असून ह्या घटनेमुळे शेजाऱ्यात सुद्धा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. १६ वर्षीय गौतमीचा डेंग्युमूळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने वास्कोतील नागरीकात ह्या आजाराबाबत पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.जुलै महीन्याच्या सुरवातीपासून अजून वास्कोतील विविध भागातील चार जणांचा डेंग्यु सदृश तापावर उपचार घेत असताना मृत्यू झाला असून गौतमी साळगावकर संशयित डेंग्यूची पाचवी बळी असल्याची माहीती सूत्रांनी दिली. जुलै महीन्याच्या सुरवातीपासून डेंग्यु सदृश तापावर उपचार घेत असताना मरण पोचलेल्या पाच जणांपैकी ३ पुरूष तर २ महीला आहेत. पावसाळा संपला तरी वास्कोतील काही भागातून अजून डेंग्यू झाल्याचा संशय असलेले रुग्ण उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात तसेच खासगी इस्पितळात दाखल होत असल्याची माहीती सूत्रांकडून मिळाली. वास्कोतील विविध भागातून अजून सापडत असलेल्या संशयित डेंग्यू रुग्णापैंकी जास्त जण नवेवाडे तसेच बायणा भागातील असल्याची माहीती सूत्रांनी दिली.नाेव्हेंबर महिन्यात १५८ जणांनी चिखली उपजिल्हा इस्पितळात घेतला डेंग्यू सदृश तापावर उपचारवास्कोतील विविध भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात संशयित डेंग्यु रुग्ण सापडले असून मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वास्कोत डेंग्यूचा फैलाव झाल्याचे दिसून आल्याने नागरीकात याबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुरगाव नगरपालिका तसेच शहरी आरोग्य खात्याने डेंग्यू पसरण्यापासून रोख लावण्याकरीता अनेक प्रकारची पावले उचलल्याचे मागील काही महिन्यात दिसून आले, तरीसुद्धा डेंग्यूचा बऱ्याच प्रमाणात फैलाव झाल्याचे दिसून आले. डेंग्यू पसरविणाऱ्या डासावर रोख लावण्यासाठी औषधाची फव्वारणी तसेच इतर उपाय करण्यात आल्याचे दिसून आले तरी सुद्धा वास्कोतील विविध भागात मागच्या काही काळात बऱ्याच प्रमाणात संशयित डेंग्यू रुग्ण सापडल्याने नागरीकात हा एक चिंतेचा विषय बनला आहे. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांना संपर्क केला असता ऑक्टोबर महीन्यात १९० संशयित डेंग्यू झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीपासून अजून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या १५८ असल्याची माहीती त्यांनी शेवटी दिली.