मडगाव: गोव्यातील चांदर रेल्वे आंदोलनाच्या वेळी रस्ता रोको प्रकरणातील संशयितांवरील खटला पुढे चालू राहणार आहे. आपल्यावरील आरोपातून मुक्त करावे या संशयिताचा अर्ज न्यायालयाने आज नामंजूर केला आहे. पुढील सुनावणी आता २ ऑगस्ट रोजी होणार आहे. मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने वरील निवाडा दिला. रेल्वे दुपरीकरणाच्या कामाच्या विरोधात दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील चांदर येथे १ नोव्हेंबर २०२० मध्ये आंदोलन झाले होते. यावेळी रस्ताही अडविण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशन्वये पोलिसांनी संशयितांवर रस्ता अडविल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.
पर्यावरणवादी अभिजित प्रभूदेसाई, कॅ. विरियातो फर्नंाडीस , डायना तावारीस, सबिता मास्कारेन्स व अन्य संशयित आहेत. या संशयितांनी आरोपनिश्चितीपुर्वी निर्देष मुक्त करण्याचा अर्ज केला होता. सरकारपक्षातर्फे त्याला विरोध करण्यात आला होता,ज्या दिवशी आदोंलन झाले होते. त्या दिवशी दक्षिण गोव्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी एका आदेशाद्वारे हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केला हाेता, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणण्याचा आरोप दाखल करुन घेणेच शक्य नाही असा दावा करत संशयितांनी या खटल्यातून आम्हाला मुक्त करावे अशी मागणी केली होती.
तर सरकारपक्षाने त्याला विरोध करताना संंशयितांविरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे सिध्द झाले आहे. संशयितांनी उपस्थित केलेला मुद्दा ग्राह आहे की नाही यावर आरोपनिश्चित करण्याच्या प्रक्रियेच्यावेळी विचार करणे शक्य असल्याचे नमूद केले होते. ज्या रस्त्यावर आंदोलन करण्यात आले तो रस्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाव्दारे रात्री १२ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत बंद करण्यात आला होता. त्यामुळे बंद रस्ता रोखल्याचा आरोप होउ शकत नाही. २५ पैकी २० साक्षिदार हे पोलिस कर्मचारी असून, हा खटला खोटया माहितीच्या आधारे केलेला आहे असा दावा संशयितांनी केला होता.