पणजी - गोव्यात दर चोवीस तासांत एका मद्यपी वाहन चालकाचा परवाना पोलीस आणि वाहतूक खात्याकडून मिळून निलंबित केला जात असतो. गेल्या तीन महिन्यांमधील सरकारी आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. गेल्या तीन महिन्यांत एकूण 272 वाहन चालकांचे विविध प्रकारच्या वाहतूक नियमांचा भंग केल्याबाबत परवाने निलंबित झाले आहेत. यात 115 मद्यपी वाहन चालकांच्या परवान्यांचा समावेश आहे.
वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना अनेक चालक आढळतात. अशा 117 चालकांचे परवाने गेल्या तीन महिन्यांत निलंबित करण्यात आल्याची नोंद वाहतूक खात्याने केली आहे. मालवाहू वाहनामधून प्रवाशांची वाहतूक करत असल्याबाबत 26 चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. मालवाहू वाहनात मर्यादेपेक्षा जास्त माल घातल्याने सहाजणांचे परवाने निलंबित करण्यात आले. अतीवेगाने वाहन हाकल्याबाबत आठजणांचे परवाने निलंबित करण्यात आले. राज्यात अपघातांचे प्रमाण गेल्यावर्षाच्या तुलनेत आता थोडे कमी झाले आहे. जानेवारी 2016 ते सप्टेंबर 2016 र्पयत एकूण 3 हजार 28 वाहन अपघात झाले होते व त्यात 244 व्यक्तींचे बळी गेले होते. अपघातांमध्ये 1 हजार 419 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2017 पर्यंत वाहन अपघातांची संख्या 2 हजार 826 पर्यंत खाली आल्याची नोंद वाहतूक खात्याने केली आहे. एकूण 235 व्यक्तींचे बळी या अपघातांमध्ये गेले. शिवाय 1308 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. वाहतूक नियमांचे व्यवस्थित पालन व्हावे म्हणून वाहतूक खात्याने व वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या कारवाई मोहीमेमुळेही अपघातांचे प्रमाण कमी होण्यास थोडी मदत झाली असे अधिका-यांचे म्हणणे आहे. मात्र प्रमाण अजून कमी व्हायला हवे, अशी सूचना सरकारने अधिका:यांना केलेली आहे. डिसेंबर महिन्यात गोव्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. हजारो अतिरिक्त वाहने गोव्यात फिरत असतात. या काळात रस्त्यावर जास्त प्रमाणात काळजी घेणो गरजेचे बनते.
दरम्यान, ज्या खासगी कारगाडय़ांचा वापर पर्यटक टॅक्सी म्हणून केला जात आहे, अशा वाहनांविरुद्धही गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक खात्याने मोहीम सुरू केली आहे. शंभरच्या आसपास अशा कारगाडय़ांविरुद्ध कारवाई झाली असल्याचे खात्याच्या अधिका-यांचे म्हणणो आहे.