मडगाव - धावत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर करण्याचे फॅड गोव्यात वाढले असून या प्रकारावर अंकुश आणण्यासाठी आता वाहतूक पोलिसही सतर्क झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात गोव्यात अशाप्रकारचे 2225 गुन्हे नोंद झाले असून आतार्पयत 280 वाहन चालकांचे वाहन परवाने तात्पुरत्या काळासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
चालत्या वाहनांवरुन मोबाईलचा वापर केल्यास वाहन चालकाला दंड आकारण्याबरोबरच तीन महिन्यासाठी त्याचा वाहन परवाना निलंबित करण्याची तजवीज कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचा आदेश देऊन कित्येक काळ लोटला तरी गोव्यात ऑक्टोबर 2016 पासूनच ही पध्दत सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत अशाप्रकारचे 775 गुन्हे नोंद झाले होते आणि त्यात 87 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. यंदा पहिल्या 9 महिन्यात 280 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जुलै 1 ते सप्टेंबर 30, 2017 या शेवटच्या तीन महिन्यात अशाप्रकारचे 977 गुन्हे नोंद झाले आहेत व 117 जणांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अशाप्रकारच्या गुन्हय़ासाठी दंडाचीही तरतूद असून खासगी वाहन चालकांसाठी 600 रुपये तर सार्वजनिक वाहन चालकांसाठी 700 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. वाहतूक पोलीस व वाहतूक खाते या दोघांनीही मोहीम कडक केली असली तरी गुन्हय़ांचे प्रमाण नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच असल्याचे आतार्पयतच्या प्रकरणावरुन निदर्शनास आले आहे.वाहतूक पोलीस विभागाचे उपअधिक्षक धर्मेश आंगले यांनी या वाढत्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करताना, आता वाहन चालकांमध्येच शिस्त येण्याची गरज व्यक्त केली. केवळ पोलीस बघतात म्हणून अशाप्रकारचे गुन्हे न करता मुळातच जबाबदारीने वाहन चालवून गुन्हे होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या शेवटच्या तीन महिन्यात गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे या शेवटच्या तीन महिन्याच्या कालावधीत हे प्रमाण अधिक वाढणार आहे त्यामुळे आम्हीही अधिक सतर्कता बाळगणार असे ते म्हणाले.