लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : गोमंतकीयांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव दि. २४ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त देवस्थान समितीतर्फे देवाला सोन्याचे आसन देण्याचा निर्णय मंगळवार दि.२६ रोजी होणाऱ्या समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठक होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ६७ लाख रुपये खर्चुन सोन्याची काठी (दांडा) देवाचरणी अर्पण करण्यात आली होती.
जत्रोत्सव ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असेल. म्हापशासह बार्देश व समस्त गोमंतकीयांचा राखणदार म्हणून श्री देव बोडगेश्वराची ख्याती आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये बोडगेश्वरचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त सात दिवस मोठी फेरी लागते. ज्यात घरगुती वस्तूंपासून सर्व प्रकारचे साहित्य मिळते. याशिवाय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच मनोरंजन पार्कही तेथे असते.
जत्रोत्सवच्या काळात नित्यपूजेसोबत भजन, दशावतारी नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी असते. विशेष म्हणजे, विविध संघटनांतर्फे सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे, फुगटी, भजन व घुमट आरती स्पर्धा आयोजित केली जाते. याचवर्षी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बोडगेश्वर देवाला सोन्याची मशाल अर्पण केली होती.
यंदा बोडगेश्वर जत्रोत्सवनिमित्त देवाला सोन्याचे आसन देण्याचा विचार आहे. त्यादृष्टीचे प्राथमिक चर्चा सुरू असून, येत्या २६ डिसेंबरला देवस्थान समितीची बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल. २०२५ मध्ये देवाला सोन्याचा फेटा अर्पण करण्याचा विचार आहे. - आनंद भाईडकर, अध्यक्ष, श्री देव बोडगेश्वर देवस्थान.