पणजी : गोव्यात भरलेल्या ५४ व्या ‘इफ्फी’च्या दिमाखदार समारोप सोहळ्यात ‘एन्डलेस बॉर्डर्स' या झेक चित्रपटाला प्रतिष्ठेचा सुवर्णमयूर पुरस्कार व ४० लाख रुपये रोख बक्षिस प्राप्त झाले. १२ आंतरराष्ट्रीय व ३ भारतीय चित्रपट या पुरस्कारासाठी स्पर्धेत होते. सुप्रसिध्द हॉलिवूड निर्माता, अभिनेता मायकल डग्लस यांना सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते डग्लस यांनी पुरस्कार स्वीकारला. उत्कृष्ट वेब मालिका पुरस्कारासाठी ‘पंचायत’ची निवड झाली. ऋषभ शेट्टीला खास परीक्षक पुरस्कार प्राप्त झाला. 'एंडलेस बॉर्डर्स' झेक चित्रपट अब्बास अमिनी यांनी दिग्दर्शित केला आहे.
इफ्फीतील अन्य पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार - स्टिफन कोमंदारेव
- सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता - पौरिया रहीमी सॅम
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार - मेलानी थिएरी
- सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म - व्हेन द सीडलिंग्ज ग्रो, (तुर्की चित्रपट- निर्माता रेगर आझाद काया)
- आयसीएफटी युनेस्को गांधी पदक - ‘ड्रिफ्ट'
- सर्वोत्कृष्ट वेब सिरीज - पंचायत
- विशेष ज्युरी पुरस्कार - ऋषभ शेट्टी
दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी बोलताना म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देऊन गोवा चित्रपट उद्योगासाठी स्वर्ग बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणत्याही अडचणींविना सुटसुटीतपणे परवानग्या, आवश्यक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. चित्रपट उद्योगासाठी गोवा रेड कार्पेट अंथरत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान गेले नऊ दिवस गोव्यात चाललेल्या इफ्फीमध्ये ७ हजार प्रतिनिधी उपस्थित राहिले. ७८ देशांतील ३७० चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते.