- मगन कळलावे
कळंगुटच्या एका लेनमध्ये चुकून पोहोचलो आणि धक्काच बसला. थायलंडला पोचल्यासारखे वाटले. तिथे थायलंडच झाल्यासारखे वाटले, असे विधान चक्क कुंडई तपोभूमीचे स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले. आता हे विधान काहीजणांना झोंबले. काहींना आवडले नाही, तर बहुतेकांनी स्वामी खरे तेच बोलले, अशी प्रतिक्रिया दिली. पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांनी तर स्वामींना वेगळा सल्ला दिला.
ब्रह्मेशानंद स्वामीजींनी पणजीला रात्री दहानंतर भेट द्यावी आणि कसिनो व्यवसायाने पणजीवर काय स्थिती आणली आहे, ते पाहावे, असे उदयने सुचवले आहे. मडकईकर यांनी एक प्रकारे भाजपवाल्यांना व पणजीच्या आमदारालाही चिमटा काढला आहे. कारण भाजप सरकार व पणजीचे आमदारही कसिनोंना रोखू शकत नाहीत. मात्र, आता ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे काम वाढलेय. आता त्यांना कुठून कुठून निमंत्रणे येतात ते पाहावे लागेल. कळंगुटला आपण पोहोचलो तर तिथे थायलंडचा अनुभव आला. जे चित्र दिसले, त्यातून डोके सुन्न झाले, असे स्वामी म्हणतात. लोकमतने याविषयी ठळक बातमी दिली. लोकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या. मात्र, एरव्ही सर्व विषयांवर बोलणारे पर्यटनमंत्री रोहन खंवटे अजून व्यक्त झालेले नाहीत. रोहनजी अजून स्वामींच्या विषयावर बोललेले नाहीत. कळंगुटचे आमदार मायकल लोबो मात्र बोलले, पण थोडक्यात आणि सावधपणे.
लोबो एरव्ही थेट व सडेतोड बोलण्याबाबत प्रसिद्ध आहेत. मात्र, स्वामींच्या विधानावर लोबो सूचक हसले. कळंगुटमध्ये आता दलाल वगैरे दिसत नाहीत. ब्रह्मेशानंद स्वामींचा मीही एक फॉलोअर आहे. मी त्यांचा आदर करतो. पण, स्वामींनी कळंगुटमध्ये नेमके काय पाहिले ते मला कळालेले नाही. मी स्वामींची भेट घेईन व त्यांना विचारीन. त्यांनी थायलंडसारखे कळंगुटमध्ये काय काय पाहित पाहिले, ते मी अगोदर जाणून घेईन, असे मायकलने सांगून मीडियाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.
ब्रह्मेशानंद स्वामी एरव्ही गोव्यातील बीच संस्कृतीवर, सनबर्न संस्कृतीवर किंवा कसिनो जुगारावर वगैरे काही बोलत नाहीत. यावेळी त्यांनी कळंगुटच्या एका भागाची तुलना चक्क थायलंडशी केली. अजून ते सनबर्न किंवा कसिनोंवर बोललेले नाहीत. मात्र, भविष्यात कदाचित बोलण्याची वेळ येईल. तो भाग वेगळा, स्वामीच्या विधानावरून फेसबुकवर मात्र खूपच चर्चा रंगलीय.
थायलंडमध्ये काय चाललेय ते स्वामींना कसे बुवा कळाले, असा प्रश्न काहीजण हळूच विचारतात. आता आजच्या काळात सगळे काही वाचनातून कळत असते. सोशल मीडियावर सर्व काही वाचण्यास उपलब्ध असते. थायलंडमध्ये सेक्स टुरिझम चालते, हे कळण्यासाठी कुणाला थायलंडला वगैरे भेट देण्याची काय गरज? थायलंडची पूर्ण जगात सेक्स टुरिझमसाठी ख्याती आहे. सर्वांना ते ठाऊक आहे.
स्वामींनाही वाचून किंवा ऐकूनच थायलंड कळाले असेल. त्यासाठी थायलंडला जाण्याची गरज नाही. तुम्ही कधी थायलंडला गेला होता काय, असे काहीजण सोशल मीडियावरून विचारतात. अरे, थायलंडला जगभरातील पर्यटक जात असतात. थायलंडला गेले म्हणून काही चुकीचे ठरत नाही. अर्थात स्वामी कधी थायलंडला पोहोचले नसतील, पण ते दुबईला पोहोचले आहेत. त्याबाबतचे त्यांचे फोटो यापूर्वी झळकले आहेत ना. फोटो तर लय भारी होते. गॉगल वगैरे लावलेले. असो! स्वामींच्या विधानाची प्रसिद्धी सगळीकडे झाल्याने आता कुणीही कळंगुटला गेले की अगोदर थायलंडची आठवण येईल एवढे मात्र निश्चित. कळंगुटची प्रतिमा बदलण्यासाठी तिथे एक आध्यात्मिक फेस्टिव्हल सरकारने आयोजित करणे योग्य ठरेल, नाही का? सरकारमधील मंत्री आमदारांना कामाला लावून मुख्यमंत्री सावंत यांनी कळंगुटला एक स्पिरीच्युअल फेस्टिव्हल आयोजित करावे लागेल.