लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनी जोरदार भाषण करताना 'श्रीपाद नाईक हे भाजपसाठी स्वामीच आहेत' अशा शब्दांत गौरव केला. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत व भाजप सरचिटणीस दामू नाईक या दोघांनी मिळून श्रीपादभाऊंना 'स्वामी' पदवीच देऊन टाकली, अशी चर्चा दिवसभर राज्यात रंगली.
दामू नाईक यांनी तर एका दगडात अनेक पक्षी मारताना श्रीपाद नाईक यांच्या काही विरोधकांना गारद केले. श्रीपादभाऊ स्वामी आहेत या विधानातून भाऊंच्या विरोधकांमध्ये योग्य तो संदेश पोहोचला.
लोकसभा निवडणुका अगदी सहा महिन्यांवर आलेल्या आहेत. त्यामुळे श्रीपाद नाईक यांच्या कालच्या वाढदिन सोहळ्याला खूपच महत्त्व होते. प्रचंड गर्दी झाली होती. मुख्यमंत्री तसेच भाजपचे अन्य नेते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. प्रथम माजी आमदार दामू नाईक यांनी भाषण करताना, श्रीपादभाऊ हे कायम संत, स्वामी व सज्जनांच्या सहवासात राहतात असा उल्लेख केला. श्रीपाद नाईक हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत, ते आमच्यासाठी म्हणजे भाजपसाठी स्वामीच आहेत, असे नाईक म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत यांनी नंतर आपल्या भाषणातही दामू नाईक यांच्या मुद्द्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री सावंत यांनी दामूंच्या विधानाशी सहमती दर्शवली. श्रीपादभाऊ नेहमीच साधू-संतांचा आदर सत्कार करीत आले आहेत. साधू-संतांचे कृपाशीर्वाद कायम भाऊंच्या पाठीशी आहेत' असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले व 'श्रीपादभाऊ हे भाजपसाठी स्वामी आहेत' असे विधान केले.
श्रीपादभाऊंचा गोव्याच्या विकासात सिंहाचा वाटा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सांपेद्र- रायबंदर येथे नाईक यांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. मंत्री रोहन खंवटे, उद्योगपती श्रीनिवास धेपे, सिद्धेश नाईक, राजेश फळदेसाई, डॉ. गोविंद काळे आदी व्यासपीठावर होते.
आयुर्वेद इस्पितळाचा रचला पाया
धारगळच्या आयुर्वेद इस्पितळाचा पाया भाऊंनी घातला, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच गेली पंचवीस वर्षे भाऊंचे दिल्लीतील सरकारी निवासस्थान हे सर्व गोमंतकीयांचेच घर झाले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. दिल्लीतील त्या बंगल्यात निवासाची व जेवणाची व्यवस्था करताना किंवा विकासकामेही करताना सर्वसामान्यांचे नेते मानल्या जाणाऱ्या भाऊंनी कधी धर्म व पक्ष असा भेदभाव केला नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
तानावडे अनुपस्थित, कारण...
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांना या सोहळ्याला येण्याची खूप इच्छा होती. मात्र, तानावडे यांना दोन दिवस ताप आल्याने ते वाढदिन सोहळ्यास येऊ शकले नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन तानावडे यांना बार्देशमधील आपल्या घरीच राहावे लागले.