म्हापसा - स्वयंपूर्ण मित्र म्हणून साळगाव पंचायत येथे सेवा, सुशासन व जनकल्याण कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहभाग घेत, लोकांच्या गाऱ्हाणी ऐकल्या. आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.
यावेळी लोकांनी नानाविध प्रश्न व समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. ज्यानुसार यापुढे प्रशासकीय अधिकार्यांनी सरकारी वाहनांतून पाहणीला जाण्याचे निर्देश दिले. लाडली लक्ष्मी योजना, गृहआधार, घरे नियमित करण्याचा विषय, साळगाव आरोग्य केंद्र पायाभूत सुविधा वाढविण्यासोबत गावात फुटबॉल मैदान उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिले.
राधिका परीथ या महिलेने सांगितले की, मागील दोन वर्षे तीन महिन्यांपासून आपल्याला गृहआधाराचे पैसे भेटलेले नाहीत. यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी तिला कागदपत्रे आमदारांच्या कार्यालयात आणून देण्यास सांगितली. आणि महिन्यांभरात तिच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले. तसेच किशोरी कांदोळकर या महिलेने सांगितले की, लाडली लक्ष्मी योजनेसाठी मागील पाच वर्षांपूर्वी अर्ज केलेला. मात्र अजूनही पैसे भेटलेले नाहीत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली की, लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत सर्वांचे पैसे वाटप करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. त्यानुसार, पुढील तीन महिन्यांत पैसे भेटतील.
सूर्या पेडणेकर म्हणाले, २०२१मध्ये साळगाव आरोग्य केंद्र सुरू केले. मात्र, नोंदणी केंद्रावर समर्पित व्यक्ती नाही. त्याचप्रमाणे, दंत ओपीडीत डॉक्टरांचा अभाव आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रात पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. मुळातच दंत डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे आळीपाळीने दंत डॉक्टर हे सर्व आरोग्य केंद्रास भेट देताहेत. अशावेळी कंत्राटी पद्धतीवर लवकरच नवीन दंत डॉक्टर घेतले जातील. जेणेकरुन, हा प्रश्न सोडविता येईल.दरम्यान, सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी पंचायती व नगरपालिकांशी आभासी पद्धतीने संवाद साधला. तसेच लोकसेवेच्या उद्देशाने आयोजित आजच्या कार्यक्रमांसाठी त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.