पणजी : एनएसयुआयतर्फे मंगळवारी आपल्या मुलाला विद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रवेश परिक्षेत प्रक्रीयेत फेरबदल करणारे कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, यासाठी राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी एनएसयुआयचे राज्यप्रमुख नौशाद चौधरी, यांच्यासोबत इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वर्षी बीएएलएलबीची प्रवेश परीक्षा कारे कायदा महाविद्यालयातर्फे घेण्यात आली होती. परंतु महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या मुलाला प्रवेश देण्यासाठी प्रवेश प्रक्रीयेत मोठा फेरबदल केला, जो कायद्याने गुन्हा आहे. गोवा बोर्डाच्या परीक्षेत त्यांच्या मुलाला केवळ ६१ टक्के गुण मिळविले आहे, त्यामुळे प्रवेश परिक्षेत त्याला १०० टक्के गुण मिळवून देण्यासाठी त्या प्राचार्यानी हे कृत्य केले आहे, असे एनएसयुआयतर्फे राज्यपालांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.या प्राचार्यांनी स्वत:ह पेपर सेट केला होता आणि त्यांनी स्वत:हच तो तपासला देखील. नियमानुसार जर शिक्षकाचा मुलगा किंवा मुलगी त्या परीक्षेला बसत असल्याला त्या शिक्षकाला पेपर सेट करण्याचा आणि पेपर तपासण्याचा कुठलाही अधिकार नसतो. तसेच मुलांना पेन्सीलच्या सहाय्याने पेपर लिहण्यास सांगितले. यावरुन स्पष्ट होते की त्यांनी अनेक नियम धाब्यावर बसविले होते, असेही निवेदनात म्हटले आहे.
एनएसयूआयने ३ जून रोजी गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांची भेट घेतली आणि बीएएलएलबी परीक्षा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आणि अद्याप चौकशी सुरू आहे. गोवा विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षापासून बीएएलएलबीची प्रवेश परीक्षा संलग्न महाविद्यालयांकडून होणारी अनियमितता थांबवावी. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रकरणाची संभाव्यता लक्षात घेऊन ती अत्यंत तत्परतेने हाताळावी, असेही एनएसयुआयने म्हटले आहे.