पणजी : अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणारी स्विमथॉन २०१७ ही स्पर्धा रविवारी (दि. ३) कोलवा-मडगाव समुद्रकिनारी रंगणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे आणि गोव्याची स्टार जलतरणपटू तलाशा प्रभू यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील ७०० खेळाडू सहभागी होतील, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य आयोजक आशीष अग्रवाल यांनी दिली. स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष असून या वर्षी खुल्या समुद्रामध्ये या आव्हानात्मक स्पर्धेसाठी विशेष त्रिकोणीय मार्गिका तयार करण्यात आली आहे. हा प्रयोग पहिल्यांदाच देशात होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेकडे राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा म्हणूनही पाहिले जाणार आहे. या स्पर्धेतील १० किमी आणि ५ किमी गटातील विजेत्या पुरुष व महिला खेळाडूस फिना वर्ल्ड चॅम्पियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकूल क्रीडा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.या वेळी गोवा पर्यटन विभागाचे राजेश काळे, साहाय्यक संचालक गणेश आर. तेली, गोवा जलतरण संघटनेचे सचिव सईद अब्दुल माजिद, बरुन कुमार खान, गिरीश बाबू आदी उपस्थित होते. अग्रवाल पुढे म्हणाले, की गेल्या वर्षी या स्पर्धेत सुमारे ६०० जलतरणपटूंचा सहभाग लाभला होता, तर यंदा हीच संख्या हजारच्यापुढे जाईल. १० किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्या पुरुष - महिला जलतरणपटूंना प्रत्येकी ५० हजार, तर ५ किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जिंकण्याची संधी असेल. एकूण ४० लाख रुपयांची ही बक्षिसे आहेत. तसेच, खुल्या जलतरण क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी आणि नवोदितांना अधिक आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेत एक किमी आणि २.५ किमी अंतराची विशेष शर्यतही आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील स्टार स्वीमर्स..गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेत देशातील स्टार स्वीमर्स सहभागी होत आहेत. त्यात वीरधवल खाडे, तलाशा प्रभू, साजन प्रकाश, संदीप सेजवाल, मंदार दिवसे आणि रुचा यांचा समावेश आहे. त्यामुळे इतर खेळाडूंसाठी ही स्पर्धा अविस्मरणीय ठरणार आहे. ओपन वॉटर स्वीमिंग स्पर्धेसाठी गोव्याला कायमचे ठिकाण म्हणून संधी मिळाली, ही बाब अभिमानास्पद आहे. या उपक्रमाने भारतातील अनेक जलतरणपटू गोव्याच्या समुद्रकिनारी आपल्या कौशल्याची चाचणी घेतील. - सईद अब्दुल माजिददरवर्षी मी या स्पर्धेची वाट पाहत असते. या स्पर्धेच्या निमित्ताने मला माझ्या मित्रांना भेटण्याची संधी मिळते. वीरधवल, मंदार, रुचा हे देशाचे आघाडीचे जलतरणपटू असून त्यांना भेटल्यानंतर स्फूर्ती मिळते. नवोदितांसाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत आहे. - तलाशा प्रभू (जलतरणपटू) स्पर्धेतील गट१० किमी- १४ वर्षांवरील पुरुष व महिला५ किमी-१४ वर्षांवरील पुरुष व महिला२.५ किमी१) १४ वर्षांखालील मुले-मुली२) १४ वर्षांवरील पुरुष व महिला३) ३५ वर्षांवरील पुरुष व महिला१ किमी स्वीमथॉन१) १४ वर्षांखालील मुले -मुली२) १४ वर्षांवरील पुरुष व महिला३) ३५ वर्षांवरील पुरुष व महिला
कोलवा बीचवर रंगणार स्विमथॉनचा थरार, देशभरातील ७०० जलतरणपटूंचा होणार सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 8:02 PM