पणजी : देशभरात दहशत माजविणाऱ्या ‘एच वन-एन वन’ साथीचा अर्थात स्वाईन फ्लूचा संसर्ग गोव्यातही वाढत असल्याचे चित्र आहे. जानेवारी ते ५ मार्च या काळात राज्यात स्वाईन फ्लूचे १२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. पैकी एक रुग्ण दगावला असून एकावर उपचार चालू आहेत. वरील काळात एकूण ६७ जणांचे थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले, पैकी १0 जणांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. सरकारच्या आरोग्य खात्याकडून ही अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. १0 रुग्ण उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाल्याचा दावाही खात्याने केला आहे. रुग्णांच्या तीन वर्गवाऱ्या करण्यात आल्या आहेत. अंगात अल्प ताप तसेच खोकला व घसा सुजलेला असेल, अंग किंवा डोके दुखत असेल आणि अतिसार तसेच उलट्यांचा त्रास होत असेल, तर त्यांची ‘अ’ वर्गवारी केलेली आहे. अशा रुग्णांना वरील लक्षणांसाठीच उपचार केले जातात. अशा रुग्णांनी घरातच राहावे, लोकांमध्ये मिसळू नये, असे बजावण्यात येते. या रुग्णांना ‘एच वन-एन वन’ चाचणीची गरज नाही. वरील लक्षणांव्यतिरिक्त अंगात प्रचंड ताप असल्यास व घसा मोठ्या प्रमाणात सुजलेला असल्यास अशा रुग्णांची ‘ब’ वर्गवारी करण्यात आलेली आहे. असे रुग्ण जर पाच वर्षांखालील मुले, गरोदर महिला, ६५ वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेले वृद्ध, फुफ्फुसाचा किंवा यकृताचा अथवा मूत्रपिंडाचा आजार असलेली व्यक्ती यापैकी कोणी असेल, तर त्यांनी घरातच राहावे. लोकांमध्ये मिसळू नये. कुटुंबातील व्यक्तींनाही अशा रुग्णांपासून संसर्गाचा धोका असतो. मात्र, अशा रुग्णांनाही ‘एच वन-एन वन’ चाचणीची गरज नाही, असे खात्याने म्हटले आहे. वरील दोन्ही प्रकारच्या लक्षणांव्यतिरिक्त एखाद्या रुग्णाला श्वसनाचा त्रास, ग्लानी येणे तसेच छातीत दुखत असल्यास किंवा रक्तदाब कमी होत असल्यास, लहान मुलांमध्ये जेवण वर्ज्य केलेले असल्यास अशा रुग्णांना तातडीने उपचारासाठी इस्पितळात दाखल करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
स्वाईन फ्लूची दहशत
By admin | Published: March 06, 2015 1:16 AM