पणजी : राज्यात गेल्या काही वर्षांपासून बचत करण्यास प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली विविध कंपन्यांनी लोकांचे पैसे लुटले आहेत. ह्युमन राईट डिफेन्डर्स संघटनेने २0१४ साली पॅनकार्ड क्लब आणि आरटीएससी लिमिटेड, सिट्रस या कंपन्यांची पोलिसांत तक्रार करूनही आतापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आलेली नाही. आता समृद्ध जीवन सोसायटी आणि टीएम शॉपी या कंपन्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक केली. सरकारने येत्या १० दिवसांत या कंपनीकडून नागरिकांचे पैसे वसूल केले नाहीत तर आंदोलन करू, असा इशारा ह्युमन राईट डिफेन्डर्स संघटनेने पत्रकार परिषदेत दिला. संघटनेचे अध्यक्ष एडविन फर्नांडिस म्हणाले, गेल्या काही वर्षांत म्हापसा, डिचोली, साखळी या भागांत ‘बचत’, ‘विमा’ या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. या संस्थांचे मालक बिगर गोमंतकीय असतात. संस्था स्थापन केल्यानंतर काही लोकांना सदस्य बनवून घेतले जाते व त्यांच्याकडून सदस्य करून घेण्यासाठी साखळी रचली जाते. या साखळीप्रमाणे त्यांना कमिशन दिले जाते. अधिक व्याज मिळत असल्याने आणि योजनेत पैसे गुंतविण्यासाठी आग्रह करणारे लोक ओळखीचे असल्याने नवीन सदस्य अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवतात. अशा संस्थांमध्ये पैसे गुंतविणाऱ्यांत महिलांचे प्रमाण जास्त आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले. विविध शहरांत अशा संस्थांना सरकारी अधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाते. या वेळी या संस्थांची चौकशी का होत नाही, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. सरकारकडून अशा फसव्या कंपन्यांची सूची करून नागरिकांत जागृती करण्याची आवश्यकता आहे. संघटनेने तक्रार केलेल्या कंपन्यांची चौकशी करून लोकांचे पैसे परत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्वरित चौकशीचा आदेश द्यावा. येत्या १० दिवसांत लोकांना त्यांचे पैसे परत मिळण्याबाबत प्रयत्न करावा. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला आहे. या वेळी संघटनेचे विविध भागांतील सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बोगस विमा कंपन्यांवर कारवाई करा
By admin | Published: August 13, 2016 1:58 AM