पणजी: जनमत कौलदिन हा गोवा मुक्तीदिनापेक्षा मोठा दिवस असल्याच्या नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या विधानाचा गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी निषेध केला आहे. हा राष्ट्रवादाचा अपमान असून सरदेसाई यांनी २६ जानेवारीपूर्वी हे वक्तव्य मागे न घेतल्यास त्यांच्या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे झेंडे दाखविले जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. वेलिंगकर यांनी सांगितले की, गोमंतकियांसाठी जनमत कौल दिन हा महत्त्वाचाच आहे आणि त्या बद्दल दुमत नसावे. जनमत कौलामुळे गोवा महाराष्ट्रापासून वेगळा झाला आणि ते गोव्यातील लोकांसाठी फायदेशीर ठरले. परंतु अर्थाचा अनर्थ करून काहीही बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. कोणत्याही विशिष्ट समूहाला खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. राष्ट्रवादाच्या मुद्यावर तडजोड नसावी. सरदेसाई यांनी या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि वक्तव्य मागे घ्यावे. २६ जानेवारीपर्यंत त्यांनी विधान मागे घेतले नाही तर गोवा सुरक्षामंच या मुद्यावर आंदोलन करील. सरदेसाई यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखविले जातील अशा इशाराही त्यांनी दिला आहे. जनमत कौल घेण्याचे १०० टक्के श्रेय कुणा एकाला देणेही योग्य ठरणार नाही. जनमत कौलासाठी पुरूषोत्तम काकोडकर, दैनिक राष्ट्रमत व कोंकणी चळवळीतील लोक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी खूप काम केलेले आहे. युनायटेड गोवन्स या त्यावेळच्या विरोधी पक्षाने जॅक सिकवेरा यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच गोवा हे स्वतंत्र राज्य राहिले आहे. त्यामुळे त्याचे श्रेय एका व्यक्तीला देणे चुकीचे ठरेल असे त्यांनी सांगितले. यावेळी अरविंद भाटीकर व्यासपीठावर होते.
'वक्तव्य मागे न घेतल्यास सरदेसाईंना काळे झेंडे दाखवू'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 10:21 PM