लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एखाद्या ठिकाणी जेव्हा कधी नवा प्रकल्प येतो, तेव्हा तेथील नागरिकांना विश्वासात घ्यायलाच हवे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरूच करू नये. कायद्यात तशी तरतूद असून, हा नियम गोव्यालाही लागू होतो, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
प्रभू म्हणाले की, लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प पुढे नेऊच नये. कारण आपल्या भागात कोणता प्रकल्प येतो, त्याची स्थिती काय असेल, याची माहिती लोकांना असणे गरजेचे आहे. मी केंद्रात मंत्री असताना एखादा प्रकल्प आणायचा असल्यास त्याबाबत लोकांची मते जाणून घेणे हा आपला हट्ट असायचा. कायद्यात तशी तरतूदही आहे.
प्रभू म्हणाले की, गोवा हा भौगोलिकदृष्ट्या लहान आहे. राज्यात जागा कमी आहेत. लोकसंख्यादेखील अन्य राज्यांच्या तुलनेत कमी असली, तरी त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प आणला जाईल, तेव्हा राज्याच्या वहन क्षमतेचा अभ्यास व्हावा. गावात जेव्हा प्रकल्प आणण्याचा निर्णय होतो, तेव्हा त्याबाबत लोकांना विश्वासात घ्यावे, त्यांच्या सहमतीने प्रकल्प व्हावेत. आयआयटी महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याचा लाभ निश्चित गोव्याला होईल. ते लोकांपर्यंत पोहोचवावेत.
'अमेझिंग गोवा' ८ नोव्हेंबरपासून
'अमेझिंग गोवा ही परिषद गोव्यात यंदा ८ ते १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये व्हायब्रेट गोवा फाउंडेशनकडून ही परिषद होईल. यात देश-विदेशातील गुंतवणूकदार सहभागी होतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.