लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सेक्स स्कॅण्डल प्रकरणात एनजीओच्या नेत्या तारा केरकर यांनी उघड आव्हान दिले आहे. मला पोलिस स्टेशनवर न्या मंत्र्याची सर्व माहिती द्यायला मी तयार आहे, असे त्या म्हणाल्या. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणात आपण मुख्यमंत्री व सभापतींना लेखी पत्र पाठवून मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडा किंवा त्याची हकालपट्टी करा, अशी मागणी केली असल्याचे केरकर यांनी सांगितले.
मंत्र्याने आपल्या कुकर्माने पक्षाचे, विधानसभेचे व राज्याचे नाव बदनाम केले आहे. विधानसभा निवडणुकीआधी एका मंत्र्याचे सेक्स स्कॅण्डल उघडकीस आले तेव्हा त्याने राजीनामा देऊन तो चौकशीला सामोरा गेला. आता हा मंत्री राजीनामा का देत नाही? चौकशीला का घाबरत आहे? आदी सवाल केरकर यांनी केले. मंत्री काही एनजीओ, महिलांना पुढे काढून पत्रकार परिषदा घ्यायला लावतो व आपण धुतल्या तांदळासारखा असल्याचे भासवतो. या एनजीओ किंवा महिला सिद्धी नाईक प्रकरणावेळी कुठे होत्या? मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले तेव्हा कुठे होत्या? असे प्रश्नही केरकर यांनी केले.