पणजी : गेल्या चार वर्षांपासून खाणग्रस्त भागातील पीडित ट्रकचालकांना सरकारतर्फे कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही. सरकारला वारंवार निवेदने सादर केली गेली. आंदोलनेही केली तरी देखील सरकार ट्रकचालकांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने शनिवार (दि. ३०) पासून शंभरपेक्षा जास्त ट्रकचालक आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करणार आहेत. प्रत्येक ट्रकचालकाला पाच लाख रुपये आर्थिक मदत ही मागणी मान्य होईपर्यंत; हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले. खनिज पीडित घटकांमध्ये सरकारने काही मोजक्याच लोकांना आर्थिक सहकार्य दिले आहे. मात्र, आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या ट्रकचालकांना मात्र या योजनांमधून वगळण्यात आले आहे. ट्रेड कॉन्फडरेशनअंतर्गत साधारण ४५0 ट्रकचालक आहेत. यातील काही ट्रकचालक हे ५0 ते ६0 वर्षांकडे पोहोचलेले आहेत. झुकत्या वयाकडे पोहोचलेल्या या ट्रकचालकांना इतरत्र नोकरी करणे आणि मिळणेही कठीण बनले आहे. मात्र, सरकार या ट्रकचालकांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने न पाहता त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच करत आले आहे. विधानसभेत सरकारने निर्णय घ्यावा यासाठी धरणे आंदोलन करून सरकारला मुदत देण्यात येत आहे. पुढील चार दिवसांत आझाद मैदानावर कामगारांची सभा होईल. या आमसभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत ट्रकचालकांच्या मागण्यांवर निर्णय दिला नाही; तर विधानसभेवर मोर्चा नेण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे राणे यांनी सांगितले.
पणजीत ट्रकचालकांचे आजपासून धरणे
By admin | Published: July 30, 2016 2:50 AM