पणजी: ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत सर्व मतदान केंद्रावर लोकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी मात्र याचे प्रमाण कमी होते. ताळगावचे आमदार जेनिफर मोन्सेरात आणि मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी देखिल आपला मतदानाचा हक्क बजाविला. एकंदरीत मतदान मात्र कमी झाल्याचे चित्र आहे.
ताळगाव पंचायत निवडणूक एकूण ११ प्रभागांमध्ये होणार होती, पण प्रभाग १ मधील सिद्धी केरकर, प्रभाग ६ मधील एस्टेला डिसोझा, प्रभाग १० मधील सागर बांदेकर आणि प्रभाग ११ मधील सिडनी पॉल बॅरेटो हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे रविवारी केवळ उर्वरित ७ प्रभागांमध्ये निवडणूक झाली. या ७ प्रभागातून १४ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
ताळगावमधील सर्व प्रभागांमध्ये मिळून सकाळी ८ ते १० या वेळेस सुमारे १५.३५ टक्के मतदान झाले. तर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ३३.४७ टक्के मतदान झाले. तसेच दुपारी २ पर्यंत ४९.८५ टक्के मतदान झाले. संपूर्ण पोलीस बंदोबस्तात सदर निवडणूक पार पडले. फ्लाईंग स्क्वाड देखील वेळोवेळी फेरफटका मारताना दिसत होते. सोमवार दि. २९ रोजी कांपाल येथील बाल भवन येथे सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.