समीर नाईक,पणजी: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ताळगाव पंचायततर्फे आपल्या क्षेत्रातील सर्व प्रभागात मॉन्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे. आता पर्यंत निदान ८० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे, उर्वरीत २० टक्के काम पुढील दोन ते तीन दिवसात पूर्ण होणार आहे, अशी माहिती ताळगावच्या सरपंच मारिया फर्नांडीस यांनी दिली.
ताळगाव पंचायत निवडणूक होऊन, नवीन समिती निवडून आल्यानंतर आम्ही मॉन्सूनपूर्व कामांच्या तयारीला लागलो होतो. पण गेल्या वीस दिवसांपासून सक्रियपणे ताळागाळात फिरून आम्ही कामाला लागलो. ताळगाव क्षेत्रात येणाऱ्या तांबडीमाती, शंकरवाडी, दुर्गावाडी, कामराभाट, व्होडले भाट, सायलेमभाट, नागाळी, ओयतीयान या भागातील गटारांची साफसफाई करण्यात आली. तसेच आवश्यक ठिकाणी रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. यातून अपघात टाळता येणार आहे, असे फर्नांडीस यांनी यावेळी सांगितले.
सांतीनेझ खाडीची साफसफाई
सांतीनेझ खाडी ही ताळगाव पंचायत क्षेत्रातून सुरू होत, पणजीपर्यंत पोहचते. महानगरपालिकेने पणजी क्षेत्रात येणाऱ्या खाडीच्या अनेक भागातील साफसफाई करण्यात आली. आम्ही पंचायत क्षेत्रात येणाऱ्या खाडीची साफसफाई केली आहे. या व्यतिरिक्त इतर लहानमोठ्या नाल्यांची देखील सफाई करण्यात आली आहे. जेणेकरून तांबडीमाती, कामराभाट, या भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही. तसेच पणजीतील काही भागात जी पुरस्थिती निर्माण होते, ती देखील होणार नाही, असेही फर्नांडीस यांनी अधिक माहिती देताना सांगितले.