समीर नाईक, पणजी: ताळगाव पंचायतवर बाबुश मोन्सेरात यांचेच वर्चस्व आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. ताळगाव पंचायतची मतमोजणी सोमवारी झाली, यात मंत्री बाबुश मोन्सेरात आणि आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी समर्थन दिलेले ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंट पॅनल विजयी झाले. ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंटचे सर्व उमेदवार विजयी झाले. विरोधक सिसील रॉड्रीग्जच्या ताळगावकर युनायटेड पॅनलने अनेक ठिकाणी बऱ्यापैकी झुंझ दिली, पण एकही प्रभागात आपला उमेदवार जिंकून आणण्यास ते अयशस्वी ठरले.
मोन्सेरातच्या पॅनलमधील चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर रविवारी ताळगाव येथे ११ पैकी ७ प्रभागासाठी निवडणूका पार पडल्या. सोमवारी कांपाल, बाल भवन येथे मतदान पार पडले. सकाळी ८.३० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी १२.३० च्या सुमारास मतमोजणी संपली. यादरम्यान सकाळपासूनच ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्होलोपमेंट फ्रंट, आणि ताळगावकर युनायटेड यांच्या समर्थकांनी बाल भवन परीसरात गर्दी केली होती. यावेळी मंत्री बाबुश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, सिसील रॉड्रीग्ज, फ्रान्सिस कुएल्हो व इतर नेते उपस्थित होते. सर्व उमेदवार जिंकल्याचे समजताच समर्थकांनी फटाके लावत जल्लोष करायला सुरुवात केली.
प्रभाग १ मधून सिध्दी केरकर, प्रभाग २ मधून माजी सरपंच आग्नेल डिकुन्हा, प्रभाग ३ मधून हेलेना परेरा, प्रभाग ४ मधून रतिका गावस, प्रभाग ५ मधून उशांत काणकोणकर, प्रभाग ६ मधून एस्टेला डिसोझा, प्रभाग ७ मधून माजी सरपंच जानू रोझारीयो, प्रभाग ८ मधून मारीया फर्नांडिस, प्रभाग ९ मधून संजना दिवकर, प्रभाग १० मधून सागर बांदेकर, आणि प्रभाग ११ मधून सिडनी बार्रेटो निवडून आले आहेत.