वास्को : इंधनसाठा घेऊन गोव्यात आलेल्या विदेशी जहाजात बेकायदेशीररीत्या लपून आलेल्या जाऊद हिलईली व अब्देल कबीर बेनबस्सी या मोरोक्को देशातील तरुणांनी जहाजातून मुरगाव बंदरात उतरून पळ काढल्याने गुरुवारी भीतीचे वातावरण पसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले व शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोरोक्कोहून फॉस्फोरिक अॅसिड घेऊन गोव्यात येणाऱ्या जहाजात लपून आलेले हे दोन्ही तरुण गुरुवारी मुरगाव बंदरातून पळाल्याचे लक्षात येताच सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली होती. त्यामुळे या दोन्ही युवकांचा कसून शोध घेण्याचे काम पोलिसांनी केले. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही युवक मुरगाव पोलिसांना गोवा शिपयार्ड परिसरात आढळून आले. त्यांना पकडून वास्को पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वास्को पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणांची पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणा वेगवेगळ्या मार्गाने चौकशी करत असून त्यांचा कुठल्या दहशतवादी संघटनेशी संपर्क आहे का, याबाबतही तपास चालू आहे. ज्या जहाजात ते तरुण लपून आले होते, त्या जहाजाच्या अधिकाऱ्यांचीही पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे. (वार्ताहर)
अवैधरीत्या गोव्यात आलेले मोरोक्कोतील तरुण गजाआड
By admin | Published: September 17, 2016 2:16 AM