म्हापसा - तहलका नियतकालिकाचा संपादक तरुण तेजपाल यांच्या विरुद्ध उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयात आपल्या सहकारी पत्रकार महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. केलेले आरोप तेजपाल यांनी फेटाळले आहेत. या आरोपपत्रावरील पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असून त्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात तेजपाल याने केलेल्या अर्जावरील अहवाल अतिरिक्त सत्र न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
आपल्या सहकारी कनिष्ठ महिला पत्रकारा विरुद्ध कथित लैंगिक छळ प्रकरणात तहलका नियतकालिकाचा संपादक तरुण तेजपाल विरूद्ध तीन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रावरील आरोप उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्या. विजया पोळ यांच्या न्यायालयात निश्चित करण्यात आले. भादसंच्या कलम ३४१, ३४२, ३५४, ३५४ (ए), ३५४ (बी), ३७६, ३७६ (२)(एफ), ३७६ (२) (के) या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले. केलेले आरोप यावेळी तेजपालच्या वतिने फेटाळण्यात आले. केलेले आरोप चुकीचे असून ते राजकीय हेतूने पे्ररित असल्याचा आरोपही यावेळी तेजपालच्या वकिलाने न्यायालयात केला. मागील चार वर्षांपासून प्रकरणावर सरकारकडून सुनावणी घेण्यास विलंब केला जात असल्याचाही आरोप यावेळी केला.
न्यायालयाने यावेळी तेजपालचे वकिल अॅड. राजीव गोम्स यांनी आरोप निश्चित करण्यास एका महिन्याची स्थगिती देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाजवळ केली होती. सत्र न्यायालयात खटला चालवण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात केलेल्या अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत आरोप निश्चित करण्यात येऊ नये असा युक्तीवाद त्यांनी केला. केलेला युक्तीवाद सरकारी वकिल फ्रान्सिस ट्रावोरा यांनी केलेल्या मागणीला विरोध केला व आरोपीच्या वेळकाढू धोरणाचा तो एक भाग असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले.
यावेळी आरोपपत्राची प्रत तरुण तेजपाल यांनी सादर करुन खंडपीठात तेजपाल यांनी केलेल्या अर्जावरील सुनावणीचा अहवाल २१ नोव्हेंबरला सादर करावा असे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. कारण नसताना आपण ही याचिका लांबवू शकत नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. २१ नोव्हेंबरपूर्वी खंडपीठातील सुनावणी पूर्ण झाल्यास अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्रावरील युक्तीवाद सुरु होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.
सरकारी वकिल फ्रान्सिस ट्रावोरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तेजपाल विरोधात निश्चित करण्यात आलेले आरोप त्याला समजावून सांगण्यात आले असल्याची माहिती दिली. आरोपीचे वकिल वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याने सुनावणी सुरु होण्यास विलंब होत असल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यांच्या वेळकाढू धोरणामुळे चार वर्षांनंतरही आरोपपत्रावरील सुनावणी सुरु होऊ शकली नसल्याचे ते पुढे म्हणाले.
तेजपालचे वकिल अॅड. राजीव गोम्स यांनी सरकारी वकिलाने केलेले आरोप फेटाळून लावताना केलेल्या मागणीनुसार आरोपपत्रातील अनेक कागदपत्रे आम्हाला वेळेवर देण्यात येत नसल्याने सुनावणीस विलंब होत असल्याचे मत व्यक्त केले. खंडपीठात केलेल्या अर्जावरील योग्य निकाल मिळून आम्हाला न्याय मिळणार अशी अपेक्षा व्यक्त करुन निकाल विरोधात गेल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सुतोवात त्यांनी दिले. तसेच न्यायालयाजवळ मागीतलेला वेळ न्यायालयाने नामंजूर केल्या प्रकरणी त्यांनी आपली नापसंती व्यक्त केली.
२०१३ साली एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिलेवर तेजपाल यांनी केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रांच) तेजपाल विरोधात १७ फेब्रुवारी २०१४ साली विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सुमारे ७९ दिवसांत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. सुनावणीवेळी त्या न्यायालयात उपस्थित होत्या. आरोपपत्रात १५० साक्षीदार नोंद करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली होती.
अतिरिक्त सत्र न्यायालयात तेजपाल विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची सुनावणी सुरु झाल्यानंतर पहिला साक्षीदार म्हणून कोणाला बोलावण्यात येणार असा प्रश्न सरकारी वकिल फ्रान्सिस ट्रावोरा यांना केला असता त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. ते त्यावेळेच्या परिस्थितीनुरुप अवलंबून राहणार असल्याचे सांगितले. २१ नोव्हेंबरनंतर सुनावणी होणार किंवा नाही हे सुद्धा सध्या ठोसपणे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांनी तेजपालविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले होते. माझ्यावरील आरोप हटवण्यात यावेत, अशी विनंती तेजपाल यांनी वकिलामार्फत केली होती. पण उच्च न्यायालयाने ही विनंती फेटाळली. २८ सप्टेंबरला त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात यावी, असे आदेश देण्यात आला होता. न्यायालयाने आरोप निश्चित केले असल्याने आता युक्तिवादाला सुरुवात होईल. 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी पार पडेल.