पणजी: पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी पत्रकार तरुण तेजपाल यांच्यावर न्यायालयात खटला काही टळणार नाही याची माहिती खुद्द तेजपालनाही आहे, न्यायालयात आव्हान याचिका सादर करून जितके या प्रकरणात विलंब करून खटला लांबविणे शक्य आहे तितका विलंब करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले आहे असा पोलिसांचाही दावा आहे आणि खुद्द तेजपालही ही वस्तुस्थिती नाकारत नाहीत.
बलात्कारासारखे गंभीर गुन्हे असलेल्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करण्यात यावा असा सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे. त्यामुळे आरोपपत्र रद्द करण्याची मागणी घेऊन कुठल्याही न्यायालयात धाव घेतली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून याचिका फेटाळली जाईल हे स्पष्टच आहे. त्याच तत्वावर त्यांची याचिका म्हापसा न्यायालयात व नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठातही फेटाळण्यात आली. त्यामुळे तेजपालला आता खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तसे आव्हन दिले नाही तर म्हापसा न्यायालयात लवकरच खटला सुरू होणार आहे. एरव्हीही ९ जानेवारी रोजी खटल्याची तारीख आहे. त्यापूर्वी तेजपालला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी आहे.
ही संधीही केवळ खटल्याची तारीख पुढे ढकलण्याशिवाय फारसे काही उपलब्ध करून देणार नाही. कारण बलात्काराची प्रकरणे कशी हाताळावी यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आपल्याच आदेशाच्या विसंगत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीही तरूण तेजपाल यांनी वेळ वाया घालविण्यासाठी अनेक युक्ती लढविल्या होत्या. पीडीत महिलेच्या मोबाईलचा क्लोन त्यांनी मागितला होता. परंतु तसा क्लोन तयार करणे अशक्य असल्याचे फॉरेन्सिक लेबॉरेटरीने स्पष्ट केल्यानंतरही त्याने न्यायालात धाव घेतली होती.
तेजपाल यांच्यावर आपल्या सहकारी पत्रकारावरील बलात्कार प्रकरणात गोव्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. क्राईम ब्रँॅने त्याप्रकरणात तेजपालला अटकही केली होती. त्याची रवानगी पोलीस कोठडीत व नंतर न्ययालयीन कोठडीतही ठेवण्यात आल होते. अॅड सरेश लोटलीकर हे या प्रकरणात क्राईम ब्रँचचे वकील आहेत.