मडगाव: गाव बचाव संस्कृती बचाव या अभियानाच्या नावाखाली काणकोणचे माजी आमदार रमेश तवडकर यांनी सुरु केलेल्या लोकसंपर्क अभियानाला विशेषत: एसटी बहुल भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या या अभियानाकडे येत्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिली जाते. ज्या भागातून या अभियानाला प्रतिसाद मिळू लागला आहे त्यातील बहुतेक भाग मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाबरोबर राहिले होते. त्यामुळे रमेश तवडकरांचे हे अभियान भाजपाला मारक ठरु शकते.
मागचे चार दिवस तवडकर धारबांदोडा मतदारसंघात तळ ठोकून असून आतापर्यंत या मतदारसंघात त्यांनी 19 बैठका घेतल्या आहेत. काणकोणपासून सुरु केलेले हे अभियान आतापर्यंत सांगे, केपे, काणकोण व धारबांदोडा या चार तालुक्यात पोहोचले आहे. यातील केपे मतदारसंघ सोडल्यास अन्य सर्व मतदारसंघ भाजपाला पोषक समजले जातात.
या अभियानाबद्दल तवडकरांना विचारले असता ते म्हणाले, वास्तविक डिसेंबर महिन्यात काणकोणात आयोजीत केल्या जाणाऱ्या लोकोत्सवाचे आमंत्रण देण्यासाठी मी हे अभियान हाती घेतले आहे. मात्र या अभियाना अंतर्गत मी जेव्हा लोकांना भेटतो त्यावेळी लोकांमध्ये भाजपबद्दल प्रचंड असंतोष असल्याचे लपून रहात नाही असे ते म्हणाले.
मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तवडकरांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे तवडकरांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपाच्या उमेदवाराला काणकोणातून पराभव स्विकारावा लागला होता. आता लोकसभा निवडणुकीतही आपण भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांच्या विरोधात निवडणूक लढवू असे यापूर्वीच तवडकरांनी जाहीर केले होते सध्या जो त्यांनी लोकसंपर्क सुरु केला आहे तो त्याचाच भाग असल्याचे समजले जाते.
रविवारी तवडकर यांनी काले येथील खुटकर वाडय़ावर बैठक घेतली होती. त्या बैठकीला झालेली गर्दी उत्स्फूर्त होती, असे तवडकर म्हणाले. आतापर्यंत हा वाडा भाजपाच्याच बाजूने मतदान करत आलेला आहे. त्यामुळे तवडकर यांनी घेतलेल्या बैठकीला या लोकांची उपस्थिती राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधणारी होती.
तवडकर म्हणाले, मी मंत्री असताना किंवा त्यापूर्वीही एसटी समाजाला त्यांचा न्याय्य हक्क मिळावा यासाठी प्रयत्न केले होते आता माङया बैठकांना मला जो प्रतिसाद मिळतो तो त्यामुळेच. सांगे व केपे या तालुक्यातही आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.आपल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, दक्षिण गोव्यातून मी निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्षापासून कित्येकजणांनी माङयाशी संपर्क साधला आहे. मी निवडणुक लढविण्याचा निर्णय पक्का केला आहे. मात्र कुठल्या पक्षाच्या उमेदवारीवर ते ठरविलेले नाही. सध्या लोकमानसाचा कानोसा घेण्याचे काम चालू आहे. लोकांकडून ज्या प्रमाणो प्रतिसाद मिळणार त्याप्रमाणो आपण निर्णय घेणार असे त्यांनी सांगितले.