वासुदेव पागी, पणजी: कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर या दोन्ही भाजप नेत्यांमधील संघर्षाची ठिणगी पुन्हा एकदा पडल्यामुळे पक्ष पातळीवरून याची दखल घेण्यात आली आहे. भाजपा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उभय नेत्यांशी बोलणार आहेत.
रमेश तवडकर यांच्या श्रमदान योजनेचा शुभारंभ प्रियोळ मतदारसंघात करण्यात आला. त्यावेळी प्रीयोळचे आमदार आणि मंत्री गावडे यांना तवडकर यांच्याकडून आमंत्रण मिळाले नव्हते. परंतु गावडे यांचे प्रतिस्पर्धी असलेले मगोचे दीपक ढवळीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामुळे गावडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे सगळे प्रकार मुख्यमंत्री पाहून शांत असल्यामुळेही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर आज असते तर हे कधीच खपवून घेतले नसते, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यांच्या या जाहीर वक्तव्यामुळे पक्ष शिस्तीला तडे गेले आहेत. यामुळे या प्रकरणाची पक्षाला दखल घ्यावी लागली आहे.
दोन दिवसांपूर्वी गावडे यांनी आणखी एक कडक वक्तव्य करताना अनुसूचित जमातीसाठी विधानसभेत राजकीय आरक्षणासंबंधी निर्णय न घेतल्यामुळे सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच या प्रकरणात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला होता.