वास्को : दाबोळी विमानतळावरून बेकायदेशीररित्या प्रवाशांची भाडी नेणाऱ्या (टाऊट्स) टॅक्सी चालकाने एका काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकाची मारहाण करून त्याला जखमी केला. मंगळवारी (दि.१४) पहाटे दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीत असलेल्या ‘टॅक्सी कांऊन्टर’ जवळ फहाद टीनवाले ह्या बेकायदेशीररित्या विमानतळावर भाडे मारणाऱ्या टॅक्सी चालकाने काळ्या पिवळ्या टॅक्सीचा चालक उलगप्पा हरीजन (रा: काटेबाटणा) याच्या नाकावर जबर मुक्का मारून त्याला जखमी केला. दाबोळी विमानतळ पोलीसांनी फहाद विरुद्ध भादस ३२५ आणि ५०६ कलमाखाली गुन्हा नोंद केला असून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्याचा शोध घेत आहेत.
दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ३.१५ वाजता ती घटना घडली. दाबोळी विमानतळावरील ‘युनायटेड टॅक्सीमन युनियन’ च्या काळ्या पिवळ्या टॅक्सीचा चालक उलगप्पा हरीजन प्रवाशाचे भाडे घेऊन जाण्यासाठी टॅक्सी कांऊन्टर जवळ उभा होता. त्याचवेळी तेथे बेकायदेशीररित्या भाडे नेण्यासाठी आलेला चालक (टाऊ्ट) फहाद टीनवाले (रा: शांतीनगर, वास्को) तेथे आला. उलगप्पा यांनी बेकायदेशीररित्या भाडे नेण्यासाठी आलेल्या फहादला जाब विचारायला गेला असता फहादने त्याच्यावर हात उचलून त्याची मारहाण केली.
फहादने उलगप्पा याच्या नाकावर जबर मुक्का मारल्याने त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होण्यास सुरवात झाली. मारहाण करून फहादने तेथून पोबारा काढला. उलगप्पा गंभीररित्या जखमी झाल्याचे दिसून येताच तेथे असलेल्यांनी त्याला त्वरित इस्पितळात नेला. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उलगप्पाच्या नाकाचे हाड तुटले असून त्याच्या दाताची नुकसानी झाली आहे. उलगप्पा याची प्रकृती सुधारली असलीतरी त्याला त्याच्या नाकावर शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहीती मिळाली. पोलीसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी फहाद विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक अरुण भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.
बेकायदेशीररित्या भाडे नेण्यासाठी आलेल्या फहाद टीनवाले यांने काळ्या पिवळ्या टॅक्सी चालक उलगप्पा याची मारहाण करून त्याला जखमी केल्याने दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमन युनियन संघटनेच्या पदाधिकारी - सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळीवर येणारी विमाने कमी झाल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. पूर्वीच आमचा व्यवसाय कमी झाला असून बेकायदेशीररित्या (टाऊट्स) काही टॅक्सी चालक भाडे नेत असल्याने आम्हाला बरेच आर्थिक नुकसान होत असल्याचे युनायटेड टॅक्सीमन युनियनचे अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी सांगितले. बेकायदेशीररित्या भाडे नेण्यासाठी येणारे अनेक टॅक्सी चालक दारू अथवा अन्य नशा करून येत असून त्यांना जर त्यांच्या कृत्याबाबत कोणी विचारायला गेल्यास ते दादागिरीवर उतरतात. ह्या विषयावर काही महिन्यापूर्वी आम्ही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी बैठक घेऊन बेकायदेशीररित्या भाडे नेणाऱ्याच्या प्रकारावर रोख लावण्याबाबत उचित पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासनाची पूर्ती होऊन काही महिने मोठ्या प्रमाणात दाबोळी विमानतळावर बेकायदेशीररित्या भाडे नेण्याचा प्रकार कमी झाल्याचे शैलेश मयेकर यांनी सांगितले.
आता सकाळच्या वेळी बेकायदेशीररित्या भाडे नेण्याचा प्रकार बंद झाला आहे, मात्र काही महिन्यापासून रात्री ७.३० नंतर पहाटे पर्यंत बेकायदेशीररित्या भाडे नेणारे टॅक्सी चालक (टाऊट्स) येथे येऊन भाडे नेत असल्याची माहीती मयेकर यांनी दिली. त्यांना जर कोणी जाब विचारायचा प्रयत्न केल्यास ते दादागीरीवर उतरतात. बेकायदेशीररित्या भाडे नेणे आणि त्यांना जाब विचारायला गेल्यास त्यांच्या दादागीरीमुळे एके प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा प्रकारे आमच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकावर हल्ला होऊनये यासाठी पोलीसांनी कडक पावले उचलवावी. तसेच उलगप्पा वर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी युनायटेड टॅक्सीमन युनियन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.