लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे: मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टवर येलो ब्लॅक टॅक्सी स्टॅन्ड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धरणे असेच चालू राहील, असा निर्णय काल आंदोलकांनी घेतला आहे. सरकारने १४४ कलम लागू करूनही आंदोलक निर्णयावर ठाम राहिले आहेत. यावेळी आंदोलकांनी सरकारने लागू केलेल्या १४४ कलमाचा निषेध करत उच्च न्यायालयाने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.
मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टवर हक्काचे येलो- ब्लॅक टॅक्सी स्टॅन्ड किंवा ब्लू टॅक्सी स्टॅन्ड उपलब्ध व्हावे यासाठी मागच्या पाच महिन्यांपासून टुगेदर मोपा इंटरनॅशनल टॅक्सी असोसिएशनकडून आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून १ मे रोजी धरणे आंदोलन करत असताना नागझर येथे सरकारला २४ तासांची मुदत दिली होती. तसेच मागणीची दखल न घेतल्यास मोपा विमानतळावर जाणारी सर्व वाहने रस्त्यावर येऊन अडवण्याचा इशारा दिला होता. सरकारने याची गंभीर दखल घेत १४४ कलम लागू केल्याने आता आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
यावेळी गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी दीपक कलंगुटकर, अॅड. जितेंद्र गावकर, प्रसाद शहापूरकर यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत टॅक्सी स्टॅन्ड उभारण्याची मागणी केली आहे. यावेळी आंदोलन करताना अखिल गोवा टॅक्सी असोसिएशन संघटना गोवा फॉरवर्ड वकील शैलेंद्र गावस, चेतन कामत, रॉक होल्डर आदींनी पाठिंबा दिला. तसेच रमाकांत तुळसकर, भास्कर नारुलकर, चेतन कामत यांनीही मनोगत व्यक्त केले.
हक्कांवर गदा
डुगेदर टॅक्सी असोसिएशनतर्फे पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी मागच्या दोन दिवसांपासून नागझर मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ३ रोजी दुपारी १२ पर्यंत सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र, सरकारने या परिसरात १४४ कलम लागू करून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी खंत आंदोलकांनी व्यक्त केली.
आवाज दाबला जातोय
मनोहर इंटरनॅशनल विमानतळासाठी पेडणे तालुक्यातील पाच ग्रामपंचायत क्षेत्रातील ९० लाख चौरस मीटर जमीन शेतकऱ्यांनी दिली आहे. आजपर्यंत पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शिवाय स्थानिकांना या प्रकल्पात टॅक्सी व्यवसाय मिळावा, यासाठी जानेवारीपासून आंदोलने, लेखी निवेदन देण्यात येत आहे. यात येलो ब्लॅक टॅक्सी स्टॅन्ड उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करत सरकारने या टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
कलम १४४ दोन महिने लागू
मोपा येथील पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पुढील दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे १४४ कलम लागू केले आहे. स्थानिक टॅक्सीचालकांनी 'रास्ता रोको'चा इशारा दिल्याने हा आदेश काढण्यात आला. उत्तर गोवा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी मोपा, सुकेकुळण जंक्शन, धारगळ, मोपा विमानतळ परिघाच्या ५०० मीटर परिसरात आणि नागझर, वारखंड, चांदेल- हंसापूर व कासावर्णे गावात जमावबंदी लागू केली आहे. 'टुगेदर फॉर पेडणेकर या बॅनरखाली टॅक्सी काउंटरसाठी आंदोलन सुरू असून, रस्ता बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. मोपा विमानतळावर टॅक्सी आणि स्वतंत्र काउंटर आणि ओला आणि उबेर टॅक्सींना परवानगी देऊ नये, अशा मागण्या आहेत. आज, बुधवारी दुपारपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"