लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मोपा विमानतळावरील गोवा माईल्स काउंटर बंद करण्याची मागणी सरकारने फेटाळली आहे. मात्र, अन्य पाच मागण्या मान्य केल्या असून, पेडणेतील आंदोलक टॅक्सी व्यावसायिकांना संप मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. परंतु, लेखी देण्याची मागणी करत टॅक्सीवाल्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
पर्वरी येथे मंत्रालयात सोमवारी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या उपस्थितीत टॅक्सी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची दोन तास बैठक झाली. आपल्या विविध मागण्यांसाठी गेले पाच दिवस पेडणे येथील टॅक्सी व्यावसायिक आंदोलन करीत आहेत. शनिवारी रात्री उशिरा टॅक्सी व्यावसायिकांची मुख्यमंत्र्यांकडे बैठकीची पहिली फेरी झाली होती. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी पुन्हा बोलावले होते. दुपारी ही बैठक झाली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, टॅक्सी व्यावसायिकांच्या सहापैकी पाच मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. आंदोलन मागे घेण्यास त्यांनी होकारही दिलेला आहे. त्याप्रमाणे आता त्यांनी संप मागे घ्यायला हवा. गोवा माईल्स काउंटर हटवणे शक्य नाही. राज्यात गोवा माईल्स कॅब एग्रीगेटर सुरू करणे, हा धोरणात्मक निर्णय होता आणि ही कंपनी चांगल्या प्रकारची दर्जेदार सेवा देत आहे. गोवा माईल्समध्ये सरकारने कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. उलट ही कंपनीच राज्याला जीएसटीच्या स्वरूपात महसूल देत आहे.
दरम्यान, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांना टॅक्सी काउंटर मोफत देण्यात यावे, पार्किंग शुल्काबाबत फेरविचार करावा, मोपा विमानतळावर सर्व प्रकारच्या खासगी टॅक्सी, खासगी भाडे सेवा, कॅब भाड्याने देणे बंद करावे, विमानतळाचा सध्याचा रस्ता स्थानिक व्यावसायिक वाहनांसाठी खुला ठेवावा, टॅक्सीचालकांसाठी लिंक रोडवर टोल आकारला जाऊ नये तसेच मोपा विमानतळावरून गोवा माईल्सचा काउंटर हटवावा, अशा सहा मागण्या होत्या.
ग्रीन कार्ड देणार : प्रवीण आर्लेकर
पत्रकारांशी बोलताना आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी गोवा माईल्स काउंटर हटवण्याची मागणी सोडून अन्य पाच मागण्या मान्य केलेल्या आहेत. पेडणे येथील टॅक्सीवाल्यांना लिंक रोड वापरण्यासाठी ग्रीन कार्ड दिले जाणार आहे.