म्हापसा : सरकारचे आडमुठे धोरण व ‘गोवा माइल्स’अॅपसेवाविरोधात गोव्यातील सर्व टॅक्सीवाले व रेंट अ बाईक संघटनावाले एकवटले आहेत. जोवर सरकार ‘गोवा माईल्स’ बंद करत नाही, तोवर पर्यटक टॅक्सी रस्त्यावर धावणार नाही, असा सज्जड इशारा देत शुक्रवारपासून टॅक्सीवाल्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.एकीकडे सरकारने ‘गोवा माईल्स’ सेवा बंद करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत हे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे टॅक्सीवाले देखील स्वत:च्या मागण्यांवर अडून राहिल्याने हा विषय अधिकच चिंघळत चालला आहे. याचा परिणाम सध्या राज्यातील पर्यटकांवर प्रामुख्याने दिसू लागला आहे. ्रराज्य सरकारच्या गोवा माईल्स सेवेला विरोधासाठी राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी सकाळपासून बेमुदत बंद सुरू केला आहे. मात्र, राज्य सरकार अॅप आधारित टॅक्सीसेवाच पुरविण्यावर ठाम आहे. तुमचे स्वतंत्र अॅप तयार करा नाहीतर गोवा माईल्स या अॅप आधारित टॅक्सीसेवेमध्ये सहभागी व्हा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा विषय सध्या शिगेला पोहचलेला आहे.सात वर्षांपासून टॅक्सीवाले विविध मागण्यांवरून आंदोलन करत आहे. सुरूवातीला स्पीड गव्हर्नरला विरोध केला होता. मात्र, सरकारने जबरदस्तीने टॅक्सीवाल्यांना स्पीड गव्हर्नर घालण्यास भाग पाडले. सध्या महामार्ग व अंतर्गत रस्त्यांचे रूंदणीकरण सुरू आहे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे व रडार बसविले आहेत. त्यामुळे या स्पीड गव्हर्नरचा आता का उपयोग? असे मत बाप्पा कोरगावकर यांनी व्यक्त केले. नीज गोंयकार व भूमिपूत्र असलेल्या टॅक्सीवाल्यांच्या पोटावर सरकार गोवा माईल्सच्या नावाने पाय देण्याचा देत आहे. शिवाय पणजीत कॅसिनोवाले लोकांना लुबाडत असल्याचा आरोपही टॅक्सीवाल्यांनी केला. त्याचप्रमाणे काही स्वतंत्र्य लॉबी ही सोशल मिडियाच्या माध्यमातून टॅक्सीवाल्यांची बदनामी करीत असल्याचे टॅक्सीवाल्यांनी नमूद केले.
अन्यथा गोव्यात पर्यटक टॅक्सी रस्त्यावर धावणारच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 4:40 PM