लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: टॅक्सी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असून मला टार्गेट केले जात आहे, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केला. यानंतर भाजपमध्येही चर्चा सुरू झाली आहे. टॅक्सी आंदोलनातून खरोखर मुख्यमंत्र्यांना काहीजण टार्गेट करत आहेत काय याचा शोध भाजपचे काही पदाधिकारीही घेत आहेत. कुणी तरी टॅक्सीवाल्यांना फूस तर लावलेली नाही ना या प्रश्नाचे उत्तर भाजपच्या कोअर टीमचे काही सदस्य देखील शोधत आहेत.
मुख्यमंत्री सावंत यांनी यापूर्वीच टॅक्सी व्यावसायिकांच्या दोन-तीन मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले आहे. शुल्क दोनशे रुपयांवरून कमी केले, तसेच पार्किंग वेळ वाढवून दिली, तरीही टॅक्सी व्यावासियांचे आंदोलन थांबलेले नाही. मुख्यमंत्र्यांना वाटते की, काहीजण या आंदोलनाद्वारे त्यांना टार्गेट करत आहेत. टॅक्सीवाल्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. टॅक्सी व्यावसायिकांनी चिथावणीच्या राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही जणांना आमदारकीची स्वप्न पडू लागलेली आहेत. या प्रकरणात राजकारण आणून काहीजण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझ्या सरकारने टॅक्सीवाल्यांचे प्रश्न वेळोवेळी सोडवलेले आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या काळात आमदारांबरोबर बैठक घेतली. अॅप आधारित अॅग्रीगटर आमदारांनीही मान्य केल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, परवाना नूतनीकरणासाठी पाच हजार रुपये भरावे लागत होते ती अडचण दूर केली. टॅक्सीवाल्यांसाठी स्टॅण्ड अधिसूचित केले. मोपावर ब्ल्यू कॅब दिल्या. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या सोडवलेल्या आहेत. मोपा विमानतळावर नकळत शुल्क वाढवलेले होते. ते दोनशे रुपयांवरून ऐंशी रुपये केले आहे. पार्किंग वेळ पाच मिनिटे होती ती दहा मिनिटे केली आहे. एवढे सारे करूनही सरकार विरोधात काहीजण टॅक्सीवाल्यांना भडकवत आहेत. टॅक्सीवाल्यांच्या अजून काही समस्या असतील तर त्यांनी स्थानिक आमदाराला घेऊन माझ्याकडे यावे.
दुसऱ्या दिवशीही आंदोलन
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सवलतींसह विविध मागण्यांसाठी टॅक्सी व्यावसायिकांनी सुरू केलेले आंदोलन काल, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सुरूच होते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वेंझी व्हिएगस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भेट घेतली. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने योग्य तो तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी भेटीला बोलावले त्यानुसार आम्ही आल्तिनो-पणजी येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर उपस्थित राहिलो. मुख्यमंत्र्यांना आम्ही धन्यवाद देतो कारण आम्हाला त्यांनी चांगली वागणूक दिल्याची बोचरी टीका अखिल गोवा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी केली. मात्र पेडणे सरकारी संकुलासमोर धरणे आंदोलन सुरू होते. रात्रीही आंदोलनस्थळी टॅक्सी व्यवसायिक आपली उपस्थिती लावून आपण या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. यावेळी गोवा टॅक्सी असोसिएशनचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर यांनी आता मुख्यमंत्र्यांनी पेडण्यात येऊन टॅक्सी व्यावसायिकांचे म्हणणे एकून घेण्याची मागणी केली. जोपर्यंत ते इथपर्यंत येत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.