पणजी : सामाजिक विकासासाठी तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सामाजिक विकासासाठी शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. आपल्याजवळ तंत्रज्ञानाबद्दलचा तुटवडा अजूनही असण्याचे कारण म्हणजे शिक्षण व संशोधन पद्धती, औद्योगिकता आणि प्रशिक्षित संस्थांचा अभाव मानला पाहिजे. शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी न बदलता एक योजनाबद्ध विकसित कार्य म्हणून पाहण्याची गरच आहे. म्हणूनच शिक्षण पद्धती समाजाची जडणघडण करणारी असावी, असे मत विख्यात शास्त्रज्ञ व गोव्याचे सुपुत्र डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या बीजभाषणात व्यक्त केले. कवळे-फोंडा येथील श्री शांतादुर्गा शिक्षण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पणजीतील कला अकादमीत रविवारी आयोजिलेल्या ‘शिक्षण व समाज’ या विषयावरील परिषदेवेळी ते बोलत होते. प्रारंभी डॉ. रघुनाथ माशेलकरांनी आपल्या बीजभाषणाने परिषदेचा पाया घातला, तर काकोडकरांनी आपल्या बीजभाषणाचा कलश चढवून दोन दिवसीय परिषदेची सांगता केली. काकोडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या योगदानाबद्दल कुतूहल बाळगणे आवश्यक आहे. शिक्षण पद्धतीत सर्वांगीण शैक्षणिक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. मुले करत असलेल्या विविध प्रयोगात त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मनावर ठसवणारे कौशल्य शिक्षणात असले पाहिजे. शाळा, विद्यालय, महाविद्यालय व विद्यापीठात कौशल्य, हा शिक्षणाचा मुख्य अंतर्गत भाग होणे आवश्यक आहे. ७०% भारत अजूनही गावात आहे. अशा ठिकाणी दर्जेदार शिक्षण हा एक चर्चेचा मुद्दा आहे. शिक्षणात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे. एकूण उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर शिक्षणात गुंतवणूक करणे योग्य ठरेल. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात शिक्षित लोक आहेत, अशा ठिकाणी अधिक उत्पन्न वाढ होते. तंत्रज्ञान वाईट नाही, तर वाईट आहे ती आपली विचार क्षमता. त्यामुळे तंत्रज्ञानाचा फायदा करून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान वापरासाठी दुसऱ्यावर अवलंबून असल्यास आपण तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करू शकत नाही. गोव्याला तंत्रज्ञानाची जाण आहे. त्याचा वापर योग्य झाल्यास गोवा देशासाठी एक आदर्श राज्य ठरू शकते, असेही ते म्हणाले. (विद्यार्थी प्रतिनिधी)
शिक्षण-तंत्रज्ञानाची सांगड हवी
By admin | Published: September 15, 2014 1:29 AM