वास्को: गोव्यात ‘कोविड १९’ च्या चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात यावी यासाठी गोव्याच्या आरोग्य खात्याचे चार डॉक्टरांच्या पथकाला प्रशिक्षण घेण्यासाठी नौदलाचे डोनियर हवाई जहाज घेऊन बुधवारी (दि. २५) सकाळी पुण्याला रवाना झाले़ गोवा वैद्यकिय इस्पितळाचे ‘मयक्रोबायलोजी’ प्रमुख डॉ़ सावीयो रॉड्रीगीस व इतर तीन डॉक्टर हे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्याला रवाना झाले आहेत.भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फि लीपिनोझ पायनमुत्तील यांना मंगळवारी रात्री गोवा सरकारकडून डॉक्टरांच्या या पथकाला नौदलाच्या हवाई जहाजाने पुण्याला नेण्याची विनंती करण्यात आली. नौदलाच्या गोवा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा सरकारने याबाबत विनंती केल्यानंतर या डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी नेण्यासाठी नौदलाने त्वरित पावले उचलली. बुधवारी (दि. २५) सकाळी नौदलाच्या गोवा विभागाच्या ‘आयएनएस हंसा’ या उड्डाण पट्टीवरून नौदलाच्या डोनियर हवाई जहाजाने सदर डॉक्टराच्या पथकाला पुण्याला जाण्यासाठी उड्डाण घेतली. हे डॉक्टरांचे पथक प्रशिक्षण घेतल्यानंतर दि. २७ मार्च रोजी गोव्यात पुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्याला रवाना झालेल्या या पथकाने गोव्यातील काही संशयित ‘कोविड १९’ (कोरोना विषाणू) रुग्णाचे नमुने चाचणीसाठी त्यांच्याबरोबर पुण्याला नेले असल्याची माहीती नौदलातील सूत्रांनी उपलब्ध केली. नौदलाचे विमान पुण्याला गेलेल्या डॉक्टरांच्या पथकाला घेऊन पुन्हा गोव्यात दाखल झाल्यानंतर गोव्यात कोविड (कोरोना विषाणू) चाचणीची त्वरित सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Coronavirus: गोव्यातून आरोग्य खात्याच्या डॉक्टरांचे पथक पुण्याला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 6:48 PM