म्हापसा : सुमारे पाच वर्षांपासून पणजीतील एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या तथा कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातून चर्चेत आलेले तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल आता पुन्हा महिला काँग्रेसच्या टार्गेटचा विषय बनले आहेत. म्हापसा शहरा पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या गेस्ट हाऊसमधून रात्री उशीरापर्यंत होत असलेल्या पार्ट्यातील ध्वनी प्रदूषणामुळे लोकांना होत असलेल्या त्रासावरुन काँग्रेसने त्यांना टार्गेट केले आहे.
बार्देस तालुक्यातील हळदोणा मतदारसंघात मयडे ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या त्यांच्या अलिशान अशा गेस्ट हाऊसमध्ये होणा-या सततच्या पार्ट्यातून होणा-या ध्वनी प्रदूषणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या गेस्ट हाऊसमध्ये नियमाचे उल्लंघन करुन सतत होत असलेल्या पार्ट्यातून होत असलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे मयडे भागातील त्रस्त लोकांचा व महिला काँग्रेसचा त्यांनी रोष त्यांनी ओढवून घेतला आहे. घडत असलेल्या प्रकारावर प्रशासनाने तातडीने उपाय योजना करुन त्या बंद न केल्यास महिला काँग्रेसच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा अध्यक्षा अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी दिला आहे.
या गेस्ट हाऊसवर सतत पार्ट्यांचे आयोजन केले जाते. प्रशासनाच्या वरदहस्ताने अनियंत्रितपणे चालत असलेल्या या पार्ट्यातून अनेक गैरप्रकार घडत असतात. त्याचा त्रास या भागातील लोकांना खास करुन जेष्ठ आजारी तसेच विद्यार्थी वर्गांना सहन करावा लागतो. त्यातून भागातील शांतता भंग झालेली आहे. या संबंधी प्रशासनातील विविध स्तरावर स्थानिकांकडून तक्रारी तसेच निवेदने सादर करुन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नसल्याने प्रशासनाच्याच आशिर्वादाने त्या चालू असल्याचा आरोप कुतिन्हो यांनी केला. म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत महिला काँग्रेस कार्यकारणीच्या इतर सदस्या तसेच उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके उपस्थित होते.
या भागातील लोकांच्या सह्याचे निवेदन असलेली प्रत स्थानिक पंचायत, पोलीस स्थानक, उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, उत्तर गोवा अधीक्षक, महासंचालक तसेच स्थानिक आमदाराला देऊन सुद्धा त्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्याचा आरोप कुतिन्हो यांनी केला. लोकांच्या हितावर दुर्लक्ष करुन मागील दोन वर्षापासून होत असलेल्या पार्ट्या व त्यात होत असलेल्या या गैर प्रकारावर तातडीने कारवाई करुन बंद करावेत अशीही जोरदार मागणी त्यांनी केली.
गोव्यातील ख्रिस्ती धर्मिय लोकांच्या लग्नाचे सोहळे रात्रीच्यावेळी आयोजित केले जातात. हे सोहळे रात्री १०.३० वाजल्यानंतर सुरु राहिल्यास त्यावर पोलीस यंत्रणेमार्फत कारवाई करुन त्या बंद पाडल्या जातात. अनेक वेळा ध्वनी यंत्रणा ताब्यात घेतली जाते. पोलिसांकडून लग्न संभारंभाचे सोहळे बंद पाडले जातात; पण बेकायदेशीररित्या चालत असलेल्या पार्ट्या मात्र सुरु ठेवल्या जातात. यातून स्थानिकांना वेगळा कायदा व राज्याबाहेरील लोकांना वेगळा कायदा असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्या म्हणाल्या.
स्थानिकांकडून अनेकवेळा रात्रीच्या वेळी गेस्ट हाऊसवर जाऊन पार्ट्या बंद करण्याची विनंती केली; पण तेथे गेलेल्यावर हात हलवत माघारी परतण्याची पाळी त्यांच्यावर आली. त्यामुळे न्याय मिळवायचा तर तो कोणाकडून असाही प्रश्न कुतिन्हो यांनी केली. गोवेकर हे शांतता प्रेमी असून जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याचे नाव अशा मुठभर गोव्या बाहेरुन येणा-या लोकांमुळे खराब होत जात असल्याचे निदर्शनाला आणून दिले.
या भागातील स्थानिक आमदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करताना हाच प्रकार त्यांच्या घरासमोर घडला असता तर त्यांनी कोणती भूमिका घेतली असती असाही प्रश्न त्यांनी केली. त्यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष का करण्यात आले असाही प्रश्न कुतिन्हो यांनी केला. घडत असलेल्या या प्रकारातून प्रशासन तेजपाल यांना घाबरत असल्याचा आरोपही करुन पुढील काही दिवसात प्रशासनाकडून योग्य भूमिका घेऊन कारवाई न केल्यास महिला काँग्रेस स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मागे पुढे राहणार नसल्याचा इशारा प्रतिमा कुतिन्हो यांनी यावेळी दिला.