काँग्रेसचे दहा आमदार फुटले होते, भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 04:52 PM2019-06-12T16:52:33+5:302019-06-12T16:54:34+5:30
विरोधी काँग्रेस पक्षाचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास सज्ज झाला होता पण भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींनी यास मान्यता दिली नाही.
पणजी - विरोधी काँग्रेस पक्षाचे दहा आमदार नुकतेच फुटले होते. दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास सज्ज झाला होता पण भाजपच्या राष्ट्रीय श्रेष्ठींनी यास मान्यता दिली नाही, कारण आम्हाला कोणताच पक्ष आता अस्थिर करायचा नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी केला.
सरचिटणीस नरेंद्र सावईकर व सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत तेंडुलकर यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी बरेच कोटी रुपये भाजपने आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला होता. आमच्याकडे रेकॉर्डीगही आहे, असे चोडणकर म्हणाले होते. त्या पाश्र्वभूमीवर बोलताना तेंडुलकर म्हणाले की चोडणकर हे काहीही आरोप करत आहेत. त्यांनी रेकॉर्डिग असल्यास जाहीर करावे. रेकॉर्डिगमधील आवाज कुणाचा ते तरी कळून येईल. ज्यावेळी सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले तेव्हा देखील पैशांचा व्यवहार झाला नव्हता. मी स्वत: हे सांगू शकतो. आता आम्ही कुणीच भाजप नेते काँग्रेसच्या कुठच्याच आमदाराशी चर्चा देखील केलेली नाही. त्यांना आम्ही आमच्या पक्षातही बोलवलेले नाही. कारण भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे एकूण तेवीस आमदारांचे संख्याबळ आहे आणि तेवढे संख्याबळ स्थिर सरकारसाठी एकदम पुरेसे आहे.
तेंडुलकर म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांतीलच एक गोष्ट आपण सांगतो. काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार झाला होता. आम्ही व भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही यास मान्यता दिली नाही. चोडणकर यांचे काँग्रेसच्या कुठच्याच आमदारावर नियंत्रण राहिलेले नाही. काँग्रेसचे आमदार सैरभैर आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे, की देशात आणि गोव्यातही पुढील पंचवीस वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. आम्हाला गोवा सरकार स्थिर ठेवायचे आहे व त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आम्ही भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. फ्रान्सिस सिल्वेरा किंवा क्लाफास डायस हे जी वक्तव्ये करत आहेत, त्यांना आम्ही रोखू शकत नाही पण आम्ही पक्षात कुणाला घेणार नाही.