पणजी: चिंबल भागात गोवा पोलिसांनी शुक्रवारी भाडेकरु पडताळणी मोहीम हाती घेतली. यात आठ जणांची भाडेकरु म्हणून रितसर नोंदणी झाली नसल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार या सर्वांवर कारवाई केली जाईल असा इशारा उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.
राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा आणण्याच्या हेतूने गोवा पोलिसांनी विशेष करुन झोपडपट्टी परिसरात भाडेकरु म्हणून राहणाऱ्यांची पडताळणी माेहीम सुरु केली आहे. प्रत्येक घर मालकाने भाडेकरुची माहिती आवश्यक त्या कागदपत्रांसह स्थानिक पोलिसस्थानकात नोंद करणे अनिवार्य आहे.
नुकतीच कोलवाळ येथील लाला की बस्ती येथे पोलिसांनी तेथील भाडेकरुंची झाडाझडती घेत पडताळणी मोहीम हाती घेतली होती. यात ९६ जणांनी भाडेकरु म्हणून रितसर नोंदणी न केल्याचे तसेच त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या सर्व ९६ जणांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर जुने गोवे पोलिसांनी चिंबल भागातील भाडेकरुंची पडताळणी सुरु केली असून त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.