पणजी - राजधानी पणजीतील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर पे पार्किंग व्यवस्था लागू केली जाणार आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा जारी केली जाईल, असे महापौर उदय मडकईकर यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) सांगितले आहे.
मडकईकर यांनी लोकमतला मुलाखत दिली. ते म्हणाले, की एकूण पाच वेगवेगळ्य़ा रस्त्यांवर पे पार्किंगची व्यवस्था सुरू करण्यासाठी निविदा जारी करण्यापूर्वी सर्व विषयांचा अभ्यास करण्यात आला आहे. निविदाविषयक कागदपत्रे सुद्धा वकिलाकडून तयार करून घेण्यात आली आहे. कारण 2016 साली लोकायुक्तांकडे पूर्वीच्या कंत्राटाचा विषय गेला होता. त्यामुळे महापालिकेचे विद्यमान आयुक्तही आता अधिक काळजी घेत आहेत. आम्हाला पारदर्शक पद्धतीने काम करायचे आहे. त्यामुळे आम्ही निविदा जारी करण्याबाबत घाई करत नाही.
मडकईकर म्हणाले, की निविदा कागदपत्रे आम्ही आयुक्तांकडे दिली आहेत. यावेळी प्रथमच कंत्राटदाराकडून पन्नास टक्के बँक गॅरंटी स्वीकारली जाईल. पूर्वी बँक गॅरंटीचे प्रमाण कमी असायचे. आता ते पन्नास टक्के असेल. शिवाय दोन महिन्यांचा महसूल अगाऊच कंत्राटदाराकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेची बाजू सुरक्षित बनेल. अशा प्रकारच्या तरतुदी निविदेत प्रथमच केल्या जात आहेत. पे पार्किगची अंमलबजावणी ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.
दरम्यान, पणजी बाजार प्रकल्पाची वीज खात्याने वीज जोडणी तोडल्याच्या विषयाबाबत बोलताना महापौर म्हणाले, की वीज जोडणी अजून खात्याने परत दिलेली नाही. हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहचला आहे. महापालिकेचे आयुक्त शुक्रवारी सायंकाळी वीजमंत्री निलेश काब्राल यांना भेटणार आहेत. तूर्त फक्त जनरेटरवर आम्ही विक्रेत्यांना वीज पुरवत आहोत.