मडगाव : दिकरपाल येथील युवकास झालेल्या मारहाणीचा निषेध करत संशयिताच्या अटकेची मागणी करणाऱ्या स्थानिकांनी दगडफेक व रास्ता रोको केल्यामुळे तणाव निर्माण झाला. या दगडफेकीत एक पोलीस व एक ग्रामस्थ जखमी झाला असून त्यांना मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आंदोलकांनी एक दुचाकी पेटवली, तर चारचाकी तीन वाहने उलथून टाकत संताप व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत लोकांनी मडगाव-केपे रस्ता रोखून धरला होता. जमाव ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी रात्री ११ वाजल्यानंतर जोरदार लाठीमार करायला सुरुवात करताच जमाव पांगला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, चर्चिल ब्रदर्स संघाकडून खेळणारा दिकरपाल येथील फुटबॉलपटू जेसन वालीस याचे अविनाश अरुण गुंजीकर या स्थानिकाशी काही कारणावरून वितुष्ट आले होते. अविनाश याचे दिकरपाल येथे घरालगतच बार अँड रेस्टॉरंट आहे. त्या ठिकाणी जेसन सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गेला असता, त्याच्यावर हॉकी स्टिकने हल्ला झाला. यात जखमी झाल्याने जेसनला मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल करण्यात आले. ही घटना कळताच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुमारे दीडशे लोकांचा जमाव घटनास्थळी जमला. संतप्त लोकांनी संशयित अविनाशच्या अटकेची मागणी करत त्याच्या घरावर तसेच बारवर दगडफेक केली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आले असता, जमावाच्या दगडफेकीत मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे कर्मचारी प्रसन्न प्रभू दगड लागून जखमी झाले. याच गडबडीत आणखी एक स्थानिक दगड लागल्याने जखमी झाला. या दोघांनाही हॉस्पिसिओत उपचारासाठी दाखल करण्यात आले. संतप्त लोकांनी पोलिसांकडे अविनाश याच्या अटकेची मागणी करत मडगाव-केपे रस्त्यावरील वाहतूक अडवून धरली. यावर तोडगा काढण्यासाठी मडगावचे उपदंडाधिकारी अजित पंचवाडकर, मडगाव विभागाचे उपअधीक्षक दिनराज गोवेकर, मडगावचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील, कोलव्याचे निरीक्षक ब्राझ मिनेझिस, मायणा-कुडतरीचे निरीक्षक हरिश मडकईकर व कुंकळ्ळीचे निरीक्षक गुरुदास कदम पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले; मात्र लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. रात्री उशिरापर्यंत वाहतूक रोखण्यात आली होती. शेवटी पोलिसांनी लाठीमार करून ग्रामस्थांना पांगविले व वाहतूक सुरळीत केली. (प्रतिनिधी)
दिकरपाल येथे तणाव
By admin | Published: May 03, 2016 1:52 AM