ख्रिस्तानंद पेडणेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
केपे : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सर्वच पक्षांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तुल्यबळ इच्छुक समोर येऊ लागल्याने आधी उमेदवारी मिळविण्याचा आटापिटा करावा लागत आहे. अशीच स्थिती सावर्डे मतदारसंघात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर येथे तिघांनी दावा केला आहे. विद्यमान आमदार दीपक पाऊसकर, माजी आमदार गणेश गावकर आणि सरपंच मनीष लाम्बोर यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता आहे. पक्षश्रेष्ठींसमोर तिघांपैकी कोणाला संधी द्यायची, हा पेच निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.
विद्यमान आमदार आणि बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर हे २०१७च्या निवडणुकीत मगो पक्षाकडून निवडून आले होते. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये २०१९मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना बांधकाम खात्याचे मंत्रीपद देण्यात आले. सध्याच्या राजकीय घडामोडीत त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांनाच यंदाची उमेदवारी मिळणार, अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांनी मकर संक्रांतीदिवशी, १४ जानेवारी रोजी प्रचाराचा नारळ फोडला. सावर्डे पंचायत क्षेत्रातून प्रचाराला सुरुवात केली.
मात्र, त्यांच्यासह आणखी दोघे येथून दावेदार आहेत. सावर्डेचे माजी आमदार गणेश गावकर यांनीही आधीच घरोघरी प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यांचे समर्थक आणि कार्यकर्तेही उमेदवारी मिळेल, असा दावा करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. गेल्या महिनाभरात गावकर आणि पाऊसकर यांच्या उमेदवारीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.
याशिवाय, कुळेचे सरपंच मनीष लाम्बोर हेही सावर्डे मतदार संघातून इच्छुक आहेत. ते गेली पंचवीस ते तीस वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी यापूर्वी दोनदा कुळे पंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम केले आहे. ते भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांनीही उमेदवारीवर दावा केल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून उमेदवार निवडीसाठी विलंब केला जात असल्याचे सावर्डे मतदार संघातून सांगण्यात येते.