- वासुदेव पागी
पणजी : नाशिक येथे एका महिलेने बाळाला जन्म दिला आणि माता व बाळाच्या सुरक्षिततेसाठी गोवा पोलिसांना धन्यवाद देणारे ट्विट या महिलेच्या भावाने केले आहे. ही पहिल्या लॉकडाऊनच्या काळातील घटना आहे.
नाशिकचे एक जोडपे अनघा राजोळे व तिचा पती गोव्यात मडगावला होते. अनघा 8 महिन्याची गरोदर होती. त्यामुळे त्यांना नाशिकला जायचे होते. परंतु वाहतूक सेवा बंद होती. सीमा ओलांडण्यासही खूप कटकटी होत्या. ऑनलाईन अर्ज वगैरे करून सर्व सोपस्कार करून जावे लागत होते. अशावेळी गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी त्यांना खूप मदत केली. त्यांना मार्गदर्शन करण्यापासून परवानगी मिळवून देण्यातही मदत केली. तसेच, सीमा ओलांडतानाही चेक नाक्यावर अडवणूक होणार नाही, याची खबरदारीही घेतली. त्यामुळे ही मंडळी सुरक्षित नाशिकला पोहोचली.
नाशिकला गेल्यावर काही दिवसांनी त्या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. हा आनंद व्यक्त करताना महिलेचा भाऊ विवेक मोगल यांनी गोवा पोलिसांना धन्यवाद देणारे ट्विट केले आहे. विशेषत: अधीक्षक पंकज कुमार सिंग यांचा त्यांनी त्या ट्विटमध्ये विशेष उल्लेख केला आहे. लॉकडाऊनच्या काळात गोवा पोलिसांनी लॉकडाऊनचे निर्बंध न पाळणाऱ्यांच्या बाबतीत तसेच कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणा-यांच्या बाबतीत दंडुक्याचा प्रसाद दिलाही असेल, परंतु असे अनेक प्रसंग आहेत जिथे गोवा पोलीस लोकांच्या मदतीना धावून आले आहेत.
इस्पितळातून डिस्चार्ज दिलेल्या महिलेला घरी पोहोचविण्याचे काम असो किंवा भुकेल्या मजदुरांना जेवण देण्याचे काम असो किंवा इतर कामे असो. कोरोना संकटाच्या काळात गोवा पोलिसांच्या या मानवतावादी कामाची दखल घेऊन अनेक अधिका-यांचा 'लोकमत'ने कोविड योद्धे म्हणून सन्मानही केला होता.
आणखी बातम्या...
वाहतूक कोंडीमुळे ‘वर्क फ्रॉम कार’, प्रवीण दरेकरांची सरकारवर टीका
दुबईत भारतीय जोडप्याची हत्या, पाकिस्तानच्या नागरिकाला अटक
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!