- वासुदेव पागीपणजी -कला संस्कृती निधी वितरण प्रकरणात कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे चौकशी करणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. सभापतींच्या या प्रकरणातील गंभीर आरोपांविषयी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती, तेव्हा तवडकर यांनी ही माहिती दिली.
कला संस्कृती साहित्य वितरण प्रकरणात तवडकर यांनी केलेल्या आरोपानंतरच विरोधी पक्षाने सरकाराच्या विरोधात केलेल्या हल्ल्याची धार अजून कमी होत नाही. बुधवारीही प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच आमदार विजय सरदेसाई यांनी मंत्री यांच्यावरील गंभीर आरोपांसंबंधी चौकशी करण्यासाठी चर्चासत्र व्हावे अशी मागणी केली. मात्र ही मागणी सभापतींनी नाकारली. त्यावेळी सरदेसाई यांनी सभापती आपल्याच आरोपांची चर्चा करणे नाकारून वाईट संदेश देत असल्याचा दावा केला. त्यावेळी तवडकर यांनी या संदर्भात निवेदन केले. ते म्हणाले की आपल्या काही पंच सदस्यांच्या मागणीच्या समर्थनार्थ मी वक्तव्य केले होते. मंत्र्यांनी या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन मला दिले आहे. त्यामुळे हा मुद्दा संपला आहे. इतके सांगून तवडकर यांनी प्रश्नोत्तर सत्र सुरू करण्यासाठी प्रश्न क्रमांक पुकारला.
दरम्यान सर्वच विरोधी सदस्यांनी या प्रकरणात चर्चा व्हावी असा आग्रह धरला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभापतींनी स्वतः केलेल्या आरोपांसंबंधी चर्चा करणयास सभापती मंजुरी देऊ शकत नाहीत असे सांगून कामकाजाचे नियमशील सांगितला.