सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोळीबार प्रकरणात गाेव्यातील दक्षिण गोवा येथील मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या निलेश वेर्णेकर याचा रक्तदाब वाढल्याने तो रुग्णालयात दाखल झाला आहे. दरम्यान त्याने जामिनासाठी न्यायालयात धावही घेतली आहे. सोमवारी हा अर्ज बाल न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे.
बुधवारी रात्री रालोय कुडतरी येथे गोळीबाराचा थरार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी ब्लॅक टायगर या सुरक्षा एजन्सीचे मालक निलेशला गुरुवारी रात्री अटक केली होती. त्याचे अन्य दोन साथिदार सदया फरार आहेत. त्यांचा सदया शो या गोळीबार प्रकरणात तक्रारदार महिलेच्या पंधरा वर्षीय मुलाने पोलिसांत जबानी दिली आहे. त्यात संशयितापैंकी एकाने आपण बाल्कनीत उभा असताना आपल्याकडे रोखून पिस्तुलने गोळया झाडल्या होत्या असे सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता संशयितांविरोधात बाल कायद्यांतर्गतही गुन्हा नोंद केला आहे.
निलेश याने आपला रक्तदाब वाढल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली होती. मात्र तपासाला त्याने दाद दिली नाही अशी माहितीही पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान या गोळीबार प्रकरणात वापरलेले पिस्तुलही अजून पोलिसांना सापडले नाही. तसेच ज्या कारचा वापर केला होता तेही सापडू शकले नाही. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.